Join us

म्हाडाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला

By सचिन लुंगसे | Published: June 14, 2024 8:09 PM

अनधिकृत होर्डिंग दिसल्यास ते काढून टाका, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

मुंबई: जुहू विलेपार्ले येथील शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील म्हाडा मालकीच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक म्हाडा व महापालिकेतर्फे शुक्रवारी काढण्यात आला. घाटकोपरमधील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अनधिकृत होर्डिंग दिसल्यास ते काढून टाका, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर म्हाडाच्या भूखंडावर असलेल्या जाहिरात फलकांचा आढावा घेतला. जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचे व अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. म्हाडाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या जाहिरात कंपन्यांना म्हाडातर्फे नोटिस बजावण्यात आली असून अनधिकृत जाहिरात फलक स्वतःहून काढून घेण्याची सूचना केली आहे. जाहिरात कंपन्यांनी तसे न केल्यास म्हाडातर्फे पालिकेच्या मदतीने जाहिरात फलक काढण्यात येणार आहेत.पालिकेतर्फे म्हाडाच्या अखत्यारीतील जमिनीवर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांबाबत जाहिरातदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जाहिरातदारांनी म्हाडाकडून प्राप्त ना-हरकत प्रमाणपत्र पालिकेला सादर केले नाही तर जाहिरात फलकांना देण्यात आलेला परवाना रद्द केला जाणार आहे.६० अनधिकृत जाहिरात फलक- म्हाडाच्या भूखंडांवरील जाहिरात फलकांची माहिती संकलित करण्यात आली.- सर्वेक्षणात म्हाडाचे ना-हरकत प्रमाणपत्र न घेता महापालिकेच्या परवानगीने म्हाडाच्या भूखंडांवर ६० अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.- हे अनधिकृत जाहिरात फलक तात्काळ हटवण्याची कारवाई करण्याबाबत म्हाडाकडून पालिकेला पत्र पाठवण्यात आले.ना हरकत प्रमाणपत्र नव्हतेशुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील ४० बाय ४० फूट आकारमानाचा जमिनीवर उभारण्यात आलेला अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यासाठी म्हाडाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते.

टॅग्स :मुंबई