मुंबई : दिंडोशीमधील खडकपाडा येथे पुन्हा म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. येथील काही नागरिकांनी या विरोधात तक्रारी करूनही अद्याप काहीच कारवाई होत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. दररोज या अनधिकृत बांधकामांमध्ये भर पडत आहे.दिंडोशी खडकपाडा येथे म्हाडाचा एक भूखंड आहे. या भूखंडाकडे म्हाडाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. यामुळे या भूखंडावर अनधिकृत बांधकामे होत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक ४०चे अध्यक्ष विलास घुले यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हाडा आणि महापालिकेकडे तक्रार करून यावर कारवाई करण्यासठी लक्ष वेधले होते, यावर काहीच कारवाई झाली नाही. पुन्हा या भूखंडाच्या उर्वरित भागावर अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे.खडकपाड्यात सप्टेंबरमध्ये जेसीबीच्या साहाय्याने जमीन मोकळी करण्यात आली. यानंतर, रातोरात २०० ते ३०० झोपड्या उभारण्यात आल्या असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना या भागामध्ये बांधकामाची संख्याही वाढली होती. तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. यासह महापालिका, म्हाडाकडे लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचे घुले यावेळी म्हणाले.म्हाडातर्फे दरवर्षी परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढण्यात येते. मात्र, मुंबईमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे जागाच उपलब्ध नसल्याने, या सोडतीमध्ये कमी घरांचा समावेश करण्यात येतो. हा गृहसाठा वाढावा, म्हणून म्हाडाने म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. या कक्षामार्फत कारवाई करण्यास लवकरच सुरुवात होणार आहे.यामुळे या कक्षाने खडकपाडा विभागातील म्हाडाच्या भूखंडावर होणाºया अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मालाडमध्ये भूमाफियांनी विविध यंत्रणांना हाताशी धरून तिथे बेकायदा कामे सुरू केली आहेत.
दिंडोशीतील खडकपाड्यात म्हाडाच्या जागेवर पुन्हा अनधिकृत बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:15 AM