Join us

अनधिकृत स्टुडिओंवर ‘ॲक्शन’, मढ, एरंगल, भाटी परिसरांतील बांधकामे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 6:34 AM

परवानगी नसताना पक्के बांधकाम, महापालिकेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालाड पश्चिमेकडील मढ, एरंगल आणि भाटी गाव परिसरात समुद्रकिनाऱ्यावरील अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाचे जोरदार अभियान महापालिकेने हाती घेतले आहे. पालिकेचे १० अभियंते, ४० कर्मचारी यांच्यासोबत ३ पोकलॅन संयंत्र, ३ जेसीबी संयंत्रे, २ डंपर, २ गॅस कटर, आदींच्या साहाय्याने ही बांधकामे हटविण्यात येत आहेत. पोलिस बंदोबस्तही तैनात असून, बांधकामांचे स्वरूप लक्षात घेता, दोन दिवसांत उर्वरित कारवाई पूर्ण होईल.

मढ परिसरात अनधिकृत फिल्म स्टुडिओ उभारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने पाहणी केली होती. त्यात सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनधिकृत फिल्म स्टुडिओंना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली होती. त्यांतील काही स्टुडिओ मालकांनी स्वतःहून बांधकामे पाडली; तर काहींनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र राष्ट्रीय हरित लवादाने अनधिकृत फिल्म स्टुडिओंवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अनधिकृत स्टुडिओ पाडले जात आहेत. मढ, मार्वे, एरंगळ, भाटी येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या स्टुडिओंवरून काही महिन्यांपूर्वी राजकीय वातावरण तापले होते. येथील ११ स्टुडिओ आणि २२ बंगल्यांबाबत तक्रार करण्यात आली होती.

भाजपाने या विषयावरून शिवसेनेला कोंडीत पकडले होते. गैरव्यवहार करून या स्टुडिओंची उभारणी करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. हा वाद पेटल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती नेमली गेली होती.

परवानगी नाही आणि पक्के बांधकाम

वेब सीरिज, चित्रपट, संगीत यांचे चित्रीकरण येथे केले जाते. स्टुडिओचे बांधकाम करण्यासाठी सीआरझेडची परवानगी घेणे आवश्यक होती. पालिकेने स्टुडिओला परवानगी दिली तेव्हा दर सहा महिन्यांनी सीआरझेडची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. मात्र ती परवानगी घेण्यात आली नाही व पक्के बांधकाम करण्यात आले होते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकिरीट सोमय्या