मुंबई : म्हाडा वसाहतींमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले असताना याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचे पत्र मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना दिले आहे.वसाहतींच्या मोकळ्या जागांचाही अशाच बेकायदेशीर पद्धतीने वापर सुरू आहे़ या जागा तत्काळ रिकाम्या करून, त्या ठिकाणी सामान्य नागरिकांसाठी घरे निर्माण करावीत, असा विचार असल्याचे मधू चव्हाण यांनी सांगितले. सर्वांसाठी घर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासोबतच कॉलनीत राहत असलेल्या लोकांच्या समस्याही यामुळे सुटू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.अनधिकृतपणे व्यवसाय करणारे सरकारला करही देत नसल्याची बाब समोर आल्याने अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर म्हाडा वसाहतींमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाºया घुसखोरांवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली तर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल, असेही चव्हाण या वेळी म्हणाले.म्हाडाच्या मुंबईमध्ये ५६ वसाहती असून यातील विक्रोळीतील कन्नमवार तसेच गोरेगाव येथील मोतीलाल नगर या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्याने या वसाहतींच्या पुनर्विकासात अनधिकृत बांधकामांचा खोडा होत असल्याने पुनर्विकासाचे काम रखडले आहे. यामुळे म्हाडाकडे घरे उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत असल्याचेही चव्हाण या वेळी म्हणाले.
अनधिकृत बांधकाम प्रकरण: म्हाडा सभापतीच म्हणतात, अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:21 AM