मुंबई : विक्रोळी टागोर नगर येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखाने बळकावून तेथे अनधिकृत दोन ते तीन घरे उभारली. यावर पालिकेच्या तोडक कारवाईचा हातोडा पडण्याआधीच उपशाखाप्रमुखाने स्वत:च बुधवारी बांधकाम पाडले. या वेळी त्याने स्थानिक महिलांसह नागरिकांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने या प्रकरणी पोलिसांनी उपशाखाप्रमुख महेंद्र कदम याच्याविरोधात केवळ एका ‘एनसी’ची नोंद केली आहे. विक्रोळी टागोर नगर येथील अनधिकृत बांधकाम प्रकरण दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. येथील ग्रुप क्रमांक ४ येथे प्रिन्स चाळ परिसरालगत गेल्या चाळीस वर्षांपासून रहिवासी वास्तव्यास आहेत. रेल्वेच्या ५ आणि ६ क्रमांकाच्या रुळांच्या कामासाठी बाधित ठरणाऱ्या यापैकी काही झोपड्या निष्कासित करत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. अशात अनेक वर्षे येथील एक भूखंड मोकळा पडून होता. विविध सण, समारंभांसाठी वापरत असलेला हा भूखंड लाटण्यासाठी सेनेचा उपशाखाप्रमुख महेंद्र कदम याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात रातोरात दोन ते तीन पक्की घरे उभारल्याचा आरोप रहिवाशांनी केला. मात्र कदम याने हे आरोप फेटाळून लावले. याबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडताच प्रशासनाने याची दखल घेत तोडक कारवाईची नोटीस धाडली. या घटनेनंतर बुधवारी पालिका अधिकारी अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण करून गेले. त्यापाठोपाठ कदम आणि त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांना धमकावून कदमने या बांधकामावर अर्धवटरीत्या तोडक कारवाईचे नाटक केले. स्थानिक महिलांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुकी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
उपशाखाप्रमुखाने स्वत:च पाडले अनधिकृत बांधकाम
By admin | Published: June 25, 2015 3:13 AM