मुंबई : महापालिकेच्या ‘ई’ विभागातील शंभुलाल पत्राचाळ, के.के. मार्ग, भायखळा येथील खोली क्रमांक २०, २२, २४, २५, २६ व ३२ मध्ये तळघर अधिक १ मजला घरांवरील अनधिकृत वाढीव बांधकाम करणाऱ्यांना नोटीस देत एकूण ६ घरांवर कारवाई करण्यात आली आहे. भायखळा (पश्चिम) येथील आझाद मार्गावरील कोयना हाऊस, सी. एस. क्रमांक १८६५ या इमारतीमधील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. इमारत क्रमांक १०७ कामाठीपुरा, शुक्लाजी स्ट्रीट येथे पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामाला नोटीस देण्यासह गाळा क्रमांक ए-४, भारत लोखंड बाजार, मौलाना शौकत अली मार्ग येथील तळमजला अधिक दोन मजल्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. विक्रीकर भवन कार्यालयासमोर, नेसबीट मार्ग, माझगाव येथेही कारवाई करण्यात आली. ‘ई’ विभागाच्या हद्दीतील ६८ तेली मोहल्ला, शेख बुरहाण कमरुद्दीन रस्ता येथील इमारतीच्या तळमजल्यावरील अनधिकृत ६ मजल्यांच्या बांधकामांना नोटीस देण्यात आली होती. नोटिसीविरुद्ध अनधिकृत बांधकाम करणारे प्रथम नगर दिवाणी न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांची याचिका फेटाळल्याने याबाबतीत कायदेशीर बाबींची पूर्तता करून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. डॉकयार्ड रोड स्थानकाजवळील नवानगर येथील २७ झोपडीधारकांनी १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्या बांधल्या होत्या. या झोपडीधारकांना नोटीस देऊन १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्या पाडण्यात आल्या. (प्रतिनिधी)
‘ई’ विभागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
By admin | Published: April 12, 2017 2:57 AM