मुंबई : मालवणीमध्ये बांधकाम कोसळून मृत्यूचे तांडव झाले असतानाच अद्यापदेखील येथील दुमजली, तीन मजली आणि चार मजली निर्माणधीन बांधकामांना रोख लागलेला नाही. आजही येथे अशा प्रकाराची बांधकामे सुरू असून, मालवणी परिसरात पुन्हा अनधिकृत बांधकामांची बांडगुळे फोफावल्याचे विदारक चित्र दिसत आहे. बांधकामे अनधिकृत असूनही महापालिका प्रशासन त्यावरील कारवाईबाबत पावले उचलत नसल्याने भविष्यात पडझडीच्या घटना घडून बळी गेल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल स्थानिकांनी केला आहे.
येथील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणी गाव येथे मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे २० व्यावसायिक खोल्यांचे एक मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. यावर तोडक कारवाई करीत बांधकाम करणाऱ्यांवर एम.आर.टी.पी. कायद्याअन्वये कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत मनपाच्या पी/उत्तर विभागाकडे माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालवणी विभागात बांधकाम कोसळून त्याखाली अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने वेगाने कारवाई करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, धारावी, कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या ठिकाणांसह मालाड, बोरीवली, कांदिवली, गोरेगाव, सांताक्रुझ आणि वांद्रे अशा बहुतांश परिसरात एक ते चार मजली टॉवरची संख्या अगणित झाली आहे. कुर्ला आणि आसपासच्या परिसरात मुंबईतील सर्वाधिक अनधिकृत बांधकामे बांधण्यात आली आहेत. या बांधकामांमध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा बांधकामांचा समावेश आहे.
बांधकामांचा दर्जा अतिशय कच्चा असतो. निकृष्ट दर्जाचे साहित्य अशा बांधकामाकरिता वापरले जाते. अनेक वेळा लोखंड अथवा भक्कम अशा खांबांचा वापर करण्याऐवजी लाकडी साहित्याचा वापर अशी बांधकामे उभी करण्यासाठी केला जातो. बांधकामांमध्ये रहिवासी गाळे असतात. अशा बांधकामांमध्ये राहणारे बहुसंख्य रहिवासी हे भाडेतत्त्वावर राहत असतात. मुंबई महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत सातत्याने जागृत राहिले पाहिजे.
- विनोद घोलप, अध्यक्ष, फाईट फॉर राईट फाउंडेशन
जबाबदारी नक्की कोणाची ?
- मालाड येथील दुर्घटनेनंतर येथील कच्च्या आणि पक्क्या अशा सर्वच बांधकामांच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
- मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मजल्यांवर मजले बांधत उभ्या राहत असलेल्या टॉवरकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे.
- मात्र अशा दुर्घटनांमध्ये रहिवाशांचे नाहक बळी जात असून, अशा दुर्घटना रोखायच्या असतील तर बांधकामांना आळा घालण्याची गरज आहे.
- म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणात २१ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या.
- जून संपला, पण मुंबई महापालिकेने अद्यापदेखील मुंबईतल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित केलेली नाही.
- बहुतांशी चाळीतल्या तळमजल्यावरील घरांनी आपल्या लगतचा परिसर वाढीव बांधकामांनी व्यापला आहे.