अ‍ॅम्युझमेंट पार्कला अनधिकृत गॅरेजचा अडथळा

By admin | Published: June 1, 2017 05:48 AM2017-06-01T05:48:19+5:302017-06-01T05:48:19+5:30

कोपरीमध्ये महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या अ‍ॅम्युझमेंट पार्कच्या कामामध्ये अनधिकृत गॅरेजचा अडथळा होवू लागला आहे.

Unauthorized garage barrier to Amusement Park | अ‍ॅम्युझमेंट पार्कला अनधिकृत गॅरेजचा अडथळा

अ‍ॅम्युझमेंट पार्कला अनधिकृत गॅरेजचा अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरीमध्ये महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या अ‍ॅम्युझमेंट पार्कच्या कामामध्ये अनधिकृत गॅरेजचा अडथळा होवू लागला आहे. अतिक्रमणामुळे या प्रकल्पाचे तलाव व परिसरातील उद्यान, प्रत्यक्ष अ‍ॅम्युझमेंट पार्क व मैदान असे तीन तुकड्यात रूपांतर झाले असून महत्त्वाकांक्षी प्रकल्प अर्धवट राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून पालिका प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
नेरूळमधील वंडर्स पार्कप्रमाणे कोपरीमधील अ‍ॅम्युझमेंट पार्क नवी मुंबईमधील लँडमार्क ठरणार आहे. सद्यस्थितीमध्ये याठिकाणी उद्यानाचा एक भाग विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उद्यानामध्ये जवळपास २० फूट लांब व १५ फूट उंच आकाराची कासवाची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
ठाणे-बेलापूर रोडवरून पामबीचला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून प्रवास करताना उद्यान व आतमधील कासवाची प्रतिकृती पाहून अनेकांची पावले उद्यानाकडे वळू लागली आहेत. सिडकोने महापालिकेला अ‍ॅम्युझमेंट पार्कसाठी दिलेल्या भूखंडावर गॅरेजचालकाने अतिक्रमण केले होते.
स्थानिक नगरसेवक विलास भोईर यांनी जवळपास पाच वर्षे सातत्याने आवाज उठवून पालिकेला उद्यानाचे काम करण्यास भाग पाडले. महापालिकेने गॅरेजचा काही भाग मोकळा केला, पण अर्ध्या भूखंडावरील अतिक्रमण हटविलेच नाही. यामुळे गॅरेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावरच उद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे.

कोपरीमधील अ‍ॅम्युझमेंट पार्कच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाने भूखंडाचा काही भाग मोकळा करून उद्यानाची निर्मिती करण्यास सुरवात केली आहे. परंतु अद्याप मोठ्या भूखंडावर गॅरेजचे अतिक्रमण जैसे थे असून ते हटविण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नाही.
- विलास भोईर, नगरसेवक, शिवसेना

1कोपरीगावचा तलाव, बाजूचे जुने उद्यान, काम सुरू असलेले अ‍ॅम्युझमेंट पार्क व बाजूला अतिक्रमण असलेले गॅरेज असा पूर्ण परिसर हा अ‍ॅम्युझमेंट पार्कचा भाग होवू शकतो. पूर्ण परिसराचा एकत्रित विकास झाल्यास शहरातील सर्वात भव्य उद्यान विकसित करता येणार आहे.

2परंतु महापालिका प्रशासनाने गॅरेजचे अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे छोट्या भूखंडावर उद्यान विकसित करून त्याला अ‍ॅम्युझमेंट पार्क नाव देण्यात आले आहे. पालिकेने वेळेत अतिक्रमण हटविले नाही तर उद्यानाचे आकर्षण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

3शहराच्या सौंदर्यात भर पाडणारा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राजकीय दबाव झुगारून अतिक्रमण हटविण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत. शिवसेना नगरसेवक विलास भोईर यांनीही पालिका प्रशासनाकडे याविषयी पाठपुरावा सुरू केला आहे. परंतु प्रशासन लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Unauthorized garage barrier to Amusement Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.