Join us

रस्त्यांवर अनधिकृत चरींची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 2:53 AM

महापालिकेची परवानगी न घेताच सुरू होते खोदकाम

मुंबई : मुंबईच्या रस्त्याखालून विविध प्रकारच्या सेवा-सुविधांचे जाळे जाते. मात्र, अनेक वेळा महापालिकेची परवानगी न घेताच रस्त्यांवर खोदकाम सुरू असते. यामुळे चांगल्या रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. मदनपुरा येथील नवीन रस्त्यावर जिओ केबल टाकण्याकरिता असेच अनधिकृत खोदकाम सुरू असल्याचे समाजवादी पक्षाचे आमदार, गटनेते रईस शेख यांनी निदर्शनास आणले. याप्रकरणी ई-विभागामार्फत संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील रस्त्यांची प्रत्येक पावसाळ्यात दुर्दशा होते. मुसळधार पाऊस, तर काही वेळा रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे ही प्रमुख कारणे असली तरी राजरोस सुरू असलेले खोदकामही यासाठी कारणीभूत ठरत आहे, अशी अनेक खोदकामे मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असल्याने महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे निदर्शनास आणले. रस्त्यांची दुरवस्था व पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली.मदनपुरा येथील शेख हाफिजुद्दीन या दीड वर्षापूर्वी बनवलेल्या रस्त्यावर खोदकाम सुरू होते. याबाबत संशय आल्याने शेख यांनी माहिती घेतली असता जिओची केबल टाकण्यासाठी खोदकाम होत असल्याचे त्यांना समजले. मात्र, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे शेख यांनी विचारणा केल्यानंतर हे खोदकाम अनधिकृतरीत्या सुरू असून, त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती शेख यांनी स्थायी समितीत दिली.अनधिकृत चर रोखणारे धोरणअनधिकृत खोदकामामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट होत आहे. त्यामुळे अनधिकृत खोदल्या जाणाऱ्या चरींबाबत मार्गदर्शक धोरण आखावे, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली. हा हरकतीचा मुद्दा समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राखून ठेवला. त्यावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.