योगेश बिडवई
मुंबई : शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे थेट महामुंबईत विक्री करण्यासाठी राज्य सरकारने प्रोत्साहन दिले असताना मुंबई, ठाण्यातील काही आठवडे बाजार गुंडांच्या दावणीला बांधले गेल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यात दोन ठिकाणी अनधिकृत फेरीवाले आणि स्थानिक गुंडांच्या दादागिरीमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन आठवडे बाजार बंद झाले आहेत. पणन शेतकरी उत्पादक कंपन्या थेट मुंबई, ठाण्यातील स्थानिक आमदार आणि माजी नगरसेवकांशी संपर्क साधून बाजार सुरू करत आहेत. त्यासाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध करून दिली जाते.
आठवडे बाजारांमुळे नागरिकांना ताजा आणि माफक दरात भाजीपाला, फळे मिळतात. मात्र यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यातून काहीवेळा स्थानिक गुंडांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचे बाजार कसे बंद पाडता येतील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कल्याणमधील योगीधाम येथे आठवडे बाजारास मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यातून अनधिकृत फेरीवाल्यांची अडचण झाली. त्यांनी स्थानिक गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना त्रास दिला. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेथील बाजार बंद केला. शेतकऱ्यांनी पोलिसांकडेही तक्रार दिली.
मुंबईकरांना हवा शेतकऱ्यांकडूनच शेतमाल
टिटवाळा येथे तर एका गावगुंडाने दारू पिऊन आठवडे बाजारात धिंगाणा घातला आणि एका तरुण शेतकऱ्याला मारहाण केली. त्यामुळे शेतकरी दहशतीत आहेत. शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र अजून कारवाई झालेली नाही.
विंग्रो ॲग्रिटेक प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे मयूर पवार म्हणाले, शेतीशी संबंध नसलेले काही लोक भाजीविक्रीत घुसले आहेत. ते, स्थानिक गुंड शेतकऱ्यांना त्रास देतात.
लोकांना ताजा शेतमाल मिळतो. अनेक सोसायट्यांनी आम्हाला अभिनंदनाचे पत्रही दिले आहे. आम्ही कल्याण-डोंबिवलीत १२ बाजार सुरू केले आहेत.
टिटवाळा येथे बाजार सुरू केला. तेथे एक स्थानिक गुंड दारू पिऊन आला व धिंगाणा घातला. येथे बाजार भरवू नका, अशी धमकी दिली. त्याने मला मारहाण केली. आम्ही पोलिसांत तक्रार दिली. मात्र कारवाई झालेली नाही. पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील आम्ही ३५ शेतकरी येथे भाजी विकायचो - संजय पवार, संयोजक, शेतकरी आठवडे बाजार