नवी मुंबई : बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करूनही देखभाल शाखा कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रतिमा राज्यभर मलीन होवू लागली आहे. संचालक मंडळ बरखास्ती व वाढीव चटईक्षेत्राचा विषय सर्वत्र गाजत आहे. शासनाच्या नवीन धोरणांमुळे मार्केटसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. या संकटातून संस्थेला बाहेर काढण्याऐवजी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बाजार आवारातील प्रश्न बिकट होत आहेत. भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. पानस्टॉल, सँडविच, समोसा व इतर विक्रेते प्रत्येक विंगमध्ये व्यवसाय करीत आहेत. देखभाल शाखेने व सुरक्षा रक्षकांनी जे कोणी अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. परंतु सर्वजण बघ्याची भूमिका घेत आहेत. व्यापाऱ्यांनीही याविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अनधिकृत फेरीवाले नक्की कोण आहेत याची नोंद प्रशासनाकडे नाही. याठिकाणी हलक्या दर्जाच्या वस्तूची विक्री केल्यामुळे कामगार व इतरांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
भाजी मार्केटमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान वाढले
By admin | Published: July 04, 2014 4:03 AM