- अजय परचुरेमुंबई- मुंबईच्या दादरमधली क्रांतीसिंह नाना पाटील मंडई .मुंबईतलं हे सर्वात मोठं भाजी मार्केट रेल्वेस्थानकापासून जवळ असल्यानं ठाणे,बदलापूर,पालघर ,विरारमधून अनेक छोटे व्यापारी इथे दररोज भाजीपाला विकत घ्यायला येतात. मात्र अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकल्याने या मंडईतील विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे मंडईचा जीव गुदमरतोय आणि ग्राहकांची सुध्दा गैरसोय होतेय. रेल्वेस्थानकापासून १५० मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले असले तरी या आदेशाला न जुमानता पहाटे ५ ते सकाळी ८ पर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांनी दादर स्टेशच्या परिसराला विळखा घातलाय. महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडून याविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने मंडईतील व्यापार्यांना याचा मोठा फटका बसलाय. दादर स्टेशन पश्चिमेला अगदी लागून असलेल्या कवी केशवसूत उड्डाणपूलाखाली हे व्यापारी पहाटे ५ पासून आपलं बस्तान बसवतात. महापालिकेची गाडी येईपर्यंत या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिकेचे कोणतेही अधिकारी या वेळात उपलब्ध नसतात. हे अनधिकृत फेरीवाले या तीन तासांत या भागात प्रचंड कचरा करतात. तसेच भाज्यांनी भरलेले टेम्पो अनधिकृतरित्या केशवसुत उड्डाणपुलावर सर्रासपणे उभे असतात त्यामुळे सकाळच्या वेळेत इथे वाहतूकीचीही समस्या निर्माण होते. पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. सकाळी ८ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ या काळात पालिकेचे कर्मचारी या भागात कार्यरत असतात. मात्र पहाटे ५ ते ८ या वेळेत कोणतीही कारवाई होत नसल्याने याचाच फायदा घेऊन या अनधिकृत फेरीवाल्यांनी सध्या या भागात आपलं चांगलंच बस्तान बसवलंय. क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील व्यापारांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. हे व्यापारी कर भरतात, वीजबील भरतात, आपल्या गाळ्यातील नोकरांचा पगार त्यांना द्यावा लागतो. हे सर्व करून या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे त्यांचा धंद्यावर गदा आलीय. कोर्टाची ऑर्डर असतानाही पालिका आणि पोलिस मूग गिळून का बसलेत. ते कारवाई का करत नाहीत? ह्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना या बदल्यात अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळण़ारा मलिदाच आहे असा आरोप भाजीव्यापारी शंकरराव पाटील यांनी लोकमतशी बोलताना केला. अनधिकृत व्यापारी आणि प्रशासन यांच्या एकत्रित संगनमतामुळेच मंडईतील व्यापार्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय अशी टीका त्यांनी केली. एलफिस्टन दुर्घटनेनंतर मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोेलनाचं हत्यार उपसल्यानंतर पालिकेने कारवाईचे सोपस्कार पूर्ण केले मात्र गेल्या कित्येक वर्षापासून अनधिकृतरित्या बसणार्या या फेरीवाल्यांकडे कानाडोळा का करण्यात येतोय? यात काही काळंबेरं तर नाही ना़ ? अशी शंका मंडईतील व्यापार्यांनी उपस्थित केलीय. चौकट आम्ही नियमानुसार फेरीवाल्यांवर कारवाई करत असतो. शिवाजी पार्क पोलिस स्टेशनची गाडी सकाळी ७ वाजल्यापासून या भागात कार्यरत असते. पालिकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या कारवाईला संरक्षण देणं हे आमचं पहिलं काम आहे. त्याप्रमाणे आम्ही कार्यरत असतो. मात्र सकाळी ३ तासात बसणार्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी पालिकेनेही आपलं बळ वाढवायला हवं गंगाधर सोनावणे - वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलिस स्टेशन आमचे कर्मचारी दिवसभर दोन शिफ्टमध्ये काम करतात. सकाळी ७ वाजल्यापासून आमची गाडी या भागात फिरत असते. भल्या पहाटे येऊन इथे फेरीवाले बसतात मात्र आमची गाडी आली की आमचे कर्मचारी त्यांना या भागातून हटवतात. मात्र वरिष्ठांकडे मी या भागात अतिरिक्त कर्मचारी वर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. जेणेकरून या अनधिकृत फेरीवाल्यांवर निर्बंध बसेल. अशोक खैरनार - सहाय्यक आयुक्त,जी नॉर्थ वॉर्ड
दादर मंडईला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:45 AM