पनवेल : ‘नयना’ क्षेत्रात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतीतील घरे सर्वसामान्य गरजू व्यक्तींच्या माथी मारण्याचा प्रयत्न पनवेल तालुक्यातील एजंटकडून सर्रास सुरू आहे. बिल्डरकडून मिळणाऱ्या दोन टक्क्यांच्या आमिषाकरिता हजारो ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी ग्राहकांकडून करण्यात आल्या आहेत. उपनगरीय रेल्वेगाड्या, एसटी, एनएमएमटी, बेस्ट, केडीएमसी त्याचबरोबर मुंबई आणि नवी मुंबईच्या तुलनेत कमी किमतीतील घरे यामुळे पनवेलमध्ये घरे घेण्याकरिता ग्राहकांचा कल गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. सिडकोने केलेला विकास, राष्ट्रीय महामार्ग आणि नवीन येणारे प्रकल्प यामुळे पनवेलला डिमांड वाढतच गेला. सिडको वसाहतीत जागा शिल्लक न राहिल्याने घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी शहराबाहेर ग्रामपंचायत हद्दीत जागा घेऊन त्या ठिकाणी इमारती उभारल्या. परिणामी भागातील रिअल इस्टेटच्या व्यवसायालाही तेजी आली आणि खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्यांची संख्या वाढली. पनवेल परिसरात सध्या एजंटांचे पेव आले असून अनेकांनी बिल्डरकडून संपूर्ण प्रोजेक्टच विक्रीकरिता घेतले आहेत. याबदल्यात कमिशन म्हणून घराच्या किमतीच्या दोन टक्के किंवा प्रति चौरस फुटाकरिता १०० ते २०० रुपयेप्रमाणे दलाली घेतली जात आहे. चांगले कमिशन मिळत असल्याने दलालही जाहिरातबाजी त्याचबरोबर माऊथ टू माऊथ पब्लिसिटी करीत ग्राहक मिळवत आहेत. पनवेल रेल्वेस्थानकासमोर नवीन पनवेल येथे अशाप्रकारे अनेक दुकाने दलालांनी थाटली आहेत. त्यामध्ये बिल्डर कमी दलालच जास्त असल्याचे जाणवते. विमानतळ, रेल्वेस्थानक, मेट्रो रेल्वे आदी प्रोजेक्ट जवळ असल्याचे शहराबाहेरील ग्राहकांना भासवून त्यांच्यावर मोहिनी घातली जाते. त्यासाठी कार्यालयात संवाद कौशल्यात पारंगत असलेल्या महिला कर्मचारीही नोकरीस ठेवल्या जातात. पनवेलजवळील विचुंबे, आकुर्ली, देवद, बोनशेत, आदई, उसर्ली, कोप्रोली, नेरे, हरीग्राम या ठिकाणी कित्येक बांधकाम हे बिनशेती परवान्याशिवाय झाले आहेत. बिल्डरने ग्रामसेवकाला हाताशी धरुन बिल्डिंगच्या प्लॅनवर सही, शिक्के घेतले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून घरबांधणी परवाना घेऊन बांधकाम केले. तीच कागदपत्रे दाखवून दलालांकडून ग्राहकांनी फसवणूक होत आहे. नयना क्षेत्रात कोणती गावे येतात, याठिकाणी बांधकामासाठी नेमकी कुणाची परवानगी लागते, याबाबत ग्राहकांना माहिती नसल्याने त्यांनी फसवणूक होत आहे.
ग्राहकांच्या माथी अनधिकृत घरे
By admin | Published: January 13, 2015 10:22 PM