Join us

नाल्यावर अनधिकृत घरे

By admin | Published: April 13, 2017 3:09 AM

एकीकडे पालिका नालेसफाई योग्य पद्धतीने करत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, पालिकेच्या या कामाला रहिवाशांकडूनच अडथळा निर्माण होत असल्याचे

मुंबई : एकीकडे पालिका नालेसफाई योग्य पद्धतीने करत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, पालिकेच्या या कामाला रहिवाशांकडूनच अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र वडाळ््यात दिसून येत आहे. वडाळ््यातील प्रियदर्शनीनगर येथे अनेक रहिवाशांनी चक्क नाल्यावर अधिक बांधकाम करत घरे उभारली आहेत. त्यामुळे पालिकेला या ठिकाणी नालेसफाईसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, तसेच नालेसफाई योग्य होत नसल्याने येथील रहिवाशांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. वडाळ््यातील कोरबा मिठागर येथील रमामाता वाडी आणि प्रियदर्शनीनगर या परिसरातून खारुक्रिक नाला वाहतो. संपूर्ण बीपीटी कॉलनी कोरबा मिठागर आणि वडाळा पोलीस ठाणे अशा भागांतील सांडपाणी या नाल्यातून वाहत ते समुद्रापर्यंत जाते. पूर्वी हा नाला ४० ते ५० फूट रुंद होता. मात्र, काही पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीवार्दाने गेल्या काही वर्षांत या नाल्यावर अनेक अनधिकृत बांधकामे झाली. अनेक रहिवाशांनी नाल्यामध्ये लोखंडी चॅनल्सच्या मदतीने घरे वाढवली आहेत, तर काही ठिकाणी अनधिकृत भरणा घालत भूमाफियांनी जागा काबीज केली आहे. काही दिवस काबीज केलेल्या जागेवर कापड बांधून, नंतर रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनधिकृतपणे पक्की घरे उभारायची आणि त्यानंतर याच घरांची बनावट कागदपत्रे बनवून ही घरे ८ ते १० लाखांत विकायची, असा व्यवसाय सध्या या माफियांकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या परिसरासमोर वडाळा पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, पोलिसांकडूनदेखील याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप एका रहिवाशाने केला. या परिसरातील काही कंत्राटदार ठरावीक रक्कम घेऊन पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना मॅनेज करत, रातोरात या रहिवाशांना ही अनधिकृत घरे बांधून देत असल्याचा आरोपीदेखील या रहिवाशांकडून करण्यात येत आहे. २६ जुलैला या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान, येथील या अनधिकृत बांधकामामुळे पुन्हा या ठिकाणी २६ जुलै होण्याची भीती काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ नाल्यावर अशा प्रकारे बांधकाम केलेल्या घरांवर कारवाई करावी आणि या नाल्याची योग्य सफाई करावी, अशी मागणीदेखील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)