आरेमध्ये झाडे तोडून उभारल्या अनधिकृत झोपड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 05:57 PM2020-05-03T17:57:02+5:302020-05-03T17:57:55+5:30
पर्यावरणवाद्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरेकॉलनीमध्ये झाडे तोडून त्याठिकाणी अनधिकृतपणे झोपड्या उभारल्या जात आहेत. या विरोधात पर्यावरणवाद्यांचनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये सध्या लॉकडाऊन आहे. मात्र असे असतानाही आरेतील युनिट क्रमांक १३ मध्ये ३० ते ३५ झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभारल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याविरोधात तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने वनशक्ती या पर्यावरणवादी संघटनेने आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
आरेमध्ये कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी यापूर्वी झाडे तोडण्यात आली. आता लॉकडाऊन सुरू असताना लॉकडाऊनचा फायदा उचलून काही झोपडपट्टी माफियांनी आरे युनिट १३ मध्ये झाडांची कत्तल सुरू केली आहे. सुमारे ३० ते ३५ कत्तल करून त्याठिकाणी अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यास सुरूवात केली आहे. याबाबत संबंधित यंत्रणांकेडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचे वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी स्पष्ट केले. विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर आरे जंगल नष्ट केले जात आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यात आता अशी आणखी बेकायदा झाडांची कत्तल झाली, तर येथील पूर्ण जंगल नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयीन लढाई सुरू केल्याचेही स्टॅलिन यांनी सांगितले आहे. तर आता या याचिकेच्या सुनावणीकडे सर्व पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
आरेमध्ये अशीच जर वृक्षतोड होत राहिली तर आरेतील वनसंपदा नष्ट होईल, यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होइल. यामुळे येथील वृक्षतोड थांबवावी आणि पर्यावरणाचे नुकसान टाळावे, अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून होऊ लागली आहे.