मुंबई : कांदिवली येथे अनधिकृतरित्या २०० हून रिक्षांची पार्किंग केली जात आहे. या रिक्षा चालकांकडून २०० रुपये प्रति महिना पार्किंगसाठी आकारले जात आहेत. या पार्किंगमुळे वाहतूककोंडी होते असून नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी टिष्ट्वटरवरून केली आहे.
मुंबई महापालिकेने वाहनतळ असलेल्या ५०० मीटर परिसरात दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे त्या भागातील रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगला काही प्रमाणात आळा बसला आहे. पण इतर ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून, अशी कारवाई होणे अपेक्षित आहे. पण काही ठिकाणी या कारवाईकडे दुर्लक्षकडे केले जात असल्याचा आरोप गोवर्धन देशमुख यांनी केला आहे. कांदिवली पूर्व येथे महिंद्रा येल्लो गेटजवळ हनुमान नगरातील दामूनगर परिसरात काहीजण रिक्षाचालकांकडून दर महिना २०० रुपये आकारून तेथे पार्किंग करून देत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी केली आहे. पूर्व येथील महिंद्रा येल्लो गेटजवळ हनुमान नगर ते दामूनगर आणि लोखंडवाला या भागात दोन्ही बाजूने रिक्षाची पार्किंग केली जाते. त्यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वाहतूक पोलीस कारवाई करतात. पण काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे सर्व वाहन वाहनचालकांवर कारवाई करून कायमस्वरुपी रस्ता रिकामा करायला हवा, असे नगरसेविका सुरेखा पाटील म्हटले आहे.अनधिकृत पार्किंग झाले व्यवसाय!या परिसरात अनधिकृत पार्किंगचा व्यवसाय झाला आहे. काहीजण त्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. पण यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत वाहतूक विभागाकडे वारंवार तक्रार केली पण अद्याप त्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे ठोस कारवाई करायला हवी तरच याला आळा बसेल.- सुरेखा पाटील, स्थानिक नगरसेविका