मुंबई : चेंबूरमधील सिंधी सोसायटी परिसरातील सर्व रस्त्यांना अनधिकृत पार्किंगचा विळखा पडला आहे. अनेकांनी आपल्या गाड्या फुटपाथवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा पार्क केल्या आहेत. अनेक गाड्या बंद स्थितीत वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथवर उभ्या आहेत. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केल्यामुळे येथे वाहतूककोंडीदेखील मोठ्या प्रमाणातहोते.सिंधी सोसायटीच्या आजूबाजूला लाल डोंगर, सुमननगर, कोकणनगर, काळारोड, कलेक्टर कॉलनी हे मोठी नागरी वस्ती असलेले परिसर आहेत. येथे राहणाºया नागरिकांची सिंधी सोसायटी परिसरातून मोठ्या प्रमाणात ये-जाअसते. या परिसरात महानगरपालिका शाळा, स्वामी विवेकानंद हायस्कूल, तुलसी टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्वामी विवेकानंद इंजिनीअरिंग कॉलेज यांसारख्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील या अनधिकृत पार्किंगचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असतो. गाड्या फुटपाथवर उभ्या केल्यामुळे चालायचे तरी कुठून, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. विद्यार्थी रस्त्यावरून चालत असल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनदेखील वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार विद्यार्थी व नागरिक करत आहेत. ४३२ क्रमांकाची बेस्ट बस याच परिसरातून जाते. अशा वेळी बसच्या समोरून एखादे वाहन आले तर परिसरात मोठी वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे बेस्ट बस चालक व इतर वाहन चालकांमध्ये वाद होतात. या ठिकाणी बस वळवतानादेखील चालकाला त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई करून रस्ते पार्किंगमुक्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.।वाहनांची वाढती संख्या हे अनधिकृत पार्किंगचे प्रमुख कारण आहे. वाहतूक विभागातर्फे आम्ही दररोज अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करतो. चेंबूरमधील प्रत्येक परिसरात जाऊन आम्ही नागरिकांना वाहने अनधिकृतपणे पार्क न करण्याचे आवाहन करत असतो. यापुढे अनधिकृतपणे पार्क गाड्यांवर कारवाई करण्यात येईल.- बाळकृष्ण माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, चेंबूर)
चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसराला अनधिकृत पार्किंगचा विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 2:04 AM