लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझगाव येथील इस्टर्न फ्रीवे खाली असणाऱ्या बीपीटी मार्गावर मागील अनेक दिवसांपासून अवजड वाहने अनधिकृतरीत्या पार्क केली जात आहेत. या मार्गावर ही वाहने रांगेत पार्क केली जात असल्यामुळे एक ते दीड किलोमीटरचा रस्ता या अनधिकृत पार्किंगने व्यापलेला आहे. दोन लेनचा असणाऱ्या या रस्त्याची एक लेन अनधिकृत पार्किंगनेच व्यापल्यामुळे येथे वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गाचा अनेक वाहनचालक कुलाबा, सीएसएमटी तसेच दक्षिण मुंबईतून पूर्व उपनगरात जाण्यासाठी वापर करतात. तसेच येथे जवळच भाऊचा धक्का, माझगाव डॉक तसेच विविध वस्तूंची गोदाम असल्याने दिवसभर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र येथे रस्त्यावर रांगेत अवजड वाहने पार्क केल्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. या अनधिकृत पार्किंगमुळे रात्रीच्या वेळेस एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक विभागाने या अनधिकृतपणे पार्क करण्यात आलेल्या अवजड वाहनांवर कारवाई करून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.