मालवणीतील प्रकार : रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचलीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छातीत दुखू लागल्याने मंगळवारी जिग्नेश परमार (२७) याला कुटुंबीयांनी रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. मात्र या परिसरात दुरुस्ती सुरू असलेल्या वीर अब्दुल हमीद मार्गावरील अनधिकृत पार्किंगमुळे तो वेळीच रुग्णालयात पोहोचू शकला नाही आणि रुग्णवाहिकेतच सर्व नातेवाइकांच्या समोर त्याने अखेरचा श्वास घेतला. या प्रकारामुळे मालवणी परिसरात प्रचंड चीड व्यक्त करण्यात येत आहे.
कारचा व्यवसाय करणारा जिग्नेश परमार मालवणीच्या गेट क्रमांक ८ या ठिकाणी कुटुंबासोबत राहत होता. छातीत दुखू लागल्याचे त्याच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णावाहिका मागवली. मात्र वीर अब्दुल हमीद मार्गावर गेट क्रमांक ८ वरून गेट ७ वर जाण्यासाठी म्हणजे अवघे ५०० मीटर अंतर गाठण्यासाठी त्यांना २० ते २५ मिनिटे लागली. या रस्त्यावर डांबरीकरण सुरू आहे. याचा फायदा घेत अनेक चालकांनी या ठिकाणी अनधिकृतपणे वाहने पार्क केली होती. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात न पोहोचल्याने जिग्नेश याचा मृत्यू झाला. वाहतूककोंडीमुळे माझ्या मुलाला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता तरी निदान या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून अन्य कोणाचा यात बळी जाण्यापासून रोखा, अशी विनंती त्यांची आई रंजना यांनी केली आहे. या प्रकरणी वाहतूक पोलिसांना फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही.
...आणि त्याने प्राण सोडले!
आम्ही त्याला केअर या स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्याकडे सोयी-सुविधा नसल्याने त्याला मालाडच्या लाइफलाइन रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. त्यादरम्यान रुग्णवाहिका १५ ते २० मिनिटे एकाच जागी अडकल्याने त्याने याचा धसका घेतला आणि नंतर त्याने माझ्या समोर प्राण सोडला.
(आशिष कटाले - परमार यांचा मित्र)