मुंबई : कुर्ला पश्चिम ते सायन पश्चिम भागांना जोडणाऱ्या एलबीएस मार्गाला अनधिकृत पार्किंगचा विळखा पडला आहे. कुर्ल्याहून सायनच्या दिशेने जाताना कुर्ला कोर्ट ते सायन रेल्वे स्थानक या तीन किलोमीटरच्या रस्त्यालगत वाहने अनधिकृतपणे पार्क केली आहेत. त्यातील अनेक वाहने फूटपाथवर पार्क केल्यामुळे नक्की चालायचे कुठून? असा प्रश्न पादचाऱ्यांना पडत आहे.
एलबीएस मार्गावर होणाºया अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे, याशिवाय बेस्ट बसच्या थांब्यासमोरही अनेकांनी गाड्या पार्क केल्यामुळे नागरिकांना बसची वाट पाहत रस्त्यावर उभ राहावे लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वाहनांची दुहेरी पार्किंग केल्यामुळे वाहनचालकांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एलबीएस मार्गावर अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढत चालले आहे. यापैकी अनेक गाड्या बरेच महिने एकाच जागेवर उभ्या असल्यामुळे गाडीखाली कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. यातील बºयाच गाड्या पुन्हा दुरुस्त होण्याच्या स्थितीत नाहीत. या गाड्यांमध्ये पाणी साचून डासांची पैदास होत आहे. काही गाड्यांचे तर केवळ सांगाडे उरल्यामुळे यांचे वाहन मालक कोण हाच प्रश्न पडला आहे. या रस्त्यावर ट्रक रांगेत पार्क केल्यामुळे रात्रीच्या वेळेस ट्रकच्या आड गर्दुल्ले ठाण मांडून बसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना येथून चालणे जिकरीचे बनते. हा संपूर्ण परिसर पार्किंगमुक्त करून पदपथ चालण्यायोग्य करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
या मार्गावरील अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई सुरू आहे. वाहतूककोंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी एकेरी पार्किंगसाठी आम्ही परवानगी दिली आहे, परंतु फूटपाथवर उभ्या असणाºया वाहनांवर कारवाई करून, वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. - दिलीप गुजर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, कुर्ला.