उड्डाणपुलाखाली अनधिकृत पार्किंग
By admin | Published: April 25, 2017 01:47 AM2017-04-25T01:47:10+5:302017-04-25T01:47:10+5:30
देशात घातपाताची शक्यता लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने शहरातील सर्वच उड्डाणपुलांखाली पार्किंगला बंदी घातली आहे. त्यामुळे
मुंबई : देशात घातपाताची शक्यता लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने शहरातील सर्वच उड्डाणपुलांखाली पार्किंगला बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक पार्किंग माफियांवर कारवायादेखील झालेल्या आहेत. मात्र, मानखुर्दच्या ट्रॉम्बे उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षांपासून माफियांकडून अनधिकृत पार्किंगचा धंदा सुरू आहे. शिवाय काही कार विके्रत्यांनीदेखील याच उड्डाणपुलाखाली कार विक्रीचा अनधिकृत व्यवसाय सुरू केला आहे.
वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, काही वर्षांपूर्वी पालिकेने उड्डाणपुलाखाली पे अॅण्ड पार्किंग सुरू केले होते. मात्र संभाव्य दहशतवादी कारवायांमुळे न्यायालयाच्या आदेशानंतर हे पार्किंग बंद करण्यात आले. सध्या काही उड्डाणपुलांखाली गार्डन तयार करण्यात आली आहेत तर काही ठिकाणी ही कामे सुरू आहेत. मात्र मानखुर्दमधील ट्रॉम्बे उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षांपासून काही पार्किंगमाफिया अनधिकृतरीत्या पार्किंगचा व्यवसाय करीत आहेत. याशिवाय याच उड्डाणपुलाखाली एका जुन्या कार विक्रेत्याकडून कार विक्रीचा अनधिकृत व्यवसायदेखील जोरात सुरू आहे. पार्किंगला बंदी असताना न्यायालय आणि पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत या कार विक्रेत्याने या ठिकाणी १५ ते २० गाड्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तर इतर ठिकाणी पार्किंगमाफिया एका तासासाठी अनधिकृत पार्किंगसाठी ५० ते १०० रुपये आकारून वाहनचालकांची लूट करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रॉम्बे वाहतूक पोलीस विभाग आणि मानखुर्द वाहतूक पोलीस विभाग यांचे कार्यालयच या उड्डाणपुलाखाली असून, त्यांच्या बाजूलाच अनधिकृत पार्किंग केले जात आहे. (प्रतिनिधी)