लोकचळवळीतून कायमचा बंद पाडला अनधिकृत कबुतरखाना; पार्लेकरांना २०१९ मध्ये झाला होता मनस्ताप
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 29, 2024 14:42 IST2024-12-29T14:40:55+5:302024-12-29T14:42:48+5:30
...अखेर जागरूक पार्लेकरांनी लोकचळवळ उभारत दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये हा अनधिकृत कबूतरखाना बंद पाडला. त्यानंतर आजतागायत येथे कबूतरांचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही, असे रहिवाशांनी सांगितले.

लोकचळवळीतून कायमचा बंद पाडला अनधिकृत कबुतरखाना; पार्लेकरांना २०१९ मध्ये झाला होता मनस्ताप
मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर मंदिराजवळील पदपथावर पूर्वी एक अनधिकृत कबूतरखाना होता. याठिकाणी दिवस-रात्र कबुतरांना चणे खायला घालण्यात येत असल्याने त्याचा स्थानिक रहिवाशांना खूप त्रास व्हायला लागला. अखेर जागरूक पार्लेकरांनी लोकचळवळ उभारत दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये हा अनधिकृत कबूतरखाना बंद पाडला. त्यानंतर आजतागायत येथे कबूतरांचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही, असे रहिवाशांनी सांगितले.
याबाबत ‘कोकणकट्टा’चे अजित पितळे यांनी सांगितले की, येथील हर्षल धराधर यांनी या अनधिकृत कबुतरखान्याचा सोसायटीतील रहिवाशांना खूप त्रास होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मोहन भिडे, हर्षल धराधर आणि १५-२० रहिवाशांनी एकत्र येत या अनधिकृत कबूतरखान्याविरोधात जोरदार मोहीम उघडली. येथील कबूतरांना चणे विकणाऱ्या चणेवाल्यांनी चक्क चणे ठेवण्यासाठी १५,००० रुपये भाड्याची खोली घेऊन २-३ माणसे कामाला ठेवली होती. आम्ही त्याला भेटून ‘येथे अनधिकृत कबूतरखाना चालवू नको,’ असे सांगितले.
पालिकेच्या के पूर्व विभाग अधिकाऱ्यांना भेटून कबूतरांना चणे खाऊ घालणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा आणि त्याबाबत फलक लावा, अशी विनंती केली. रहिवाशांनाही कबुतरांना खायला घातल्यास कारवाई होऊ शकते, याबाबत जनजागृती करू लागलो. दोन महिन्यांनंतर प्रयत्नांना यश आले आणि लोकचळवळीतून हा अनधिकृत कबुतरखाना कायमचा बंद झाला. आता येथे एकही कबूतर बसत नाही, अशी माहिती पितळे यांनी दिली.
श्वसनविकाराने तिघांचा मृत्यू?
- या अनधिकृत कबूतरखान्यामुळे एका सोसायटीत राहणाऱ्या तीन नागरिकांना फुफ्फुसाचा त्रास
व्हायला लागला होता, तर एका सीएने चक्क कबूतरांच्या त्रासाला कंटाळून स्वत:चे घर विकून टाकले होते, अशी माहिती हर्षल धराधर यांनी दिली.
- कबुतरखान्यामुळे श्वसनविकाराशी संबंधित आजाराने येथे तिघांचा मृत्यू देखील झाल्याचेही सांगण्यात येत आहे.