पार्किंगच्या नावाखाली देवनारमध्ये अनधिकृत वसुली
By admin | Published: September 13, 2016 03:20 AM2016-09-13T03:20:34+5:302016-09-13T03:20:34+5:30
बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात सध्या बकरे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या वाढत्या गर्दीचा फायदा घेत काही पार्किंग माफिया वाहन चालकांकडून अनधिकृतरित्या वसुली करत आहेत.
मुंबई: बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात सध्या बकरे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या वाढत्या गर्दीचा फायदा घेत काही पार्किंग माफिया वाहन चालकांकडून अनधिकृतरित्या वसुली करत आहेत. याबाबत एका वाहन चालकाच्या तक्रारीनंतर देवनार पोलिसांनी एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मंगळवारी संपूर्ण देशात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांची बकरे खरेदीसाठी देवनार वशुवधगृह येथे मोठी गर्दी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून याठिकाणी अनेक विक्रेते वाहने घेऊन येतात. गेल्या महिनाभरापासूनच या ठिकाणी गर्दी येथे होत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पालिकेने या परिसरात एका खासगी संस्थेला पार्किंगचे कंत्राट दिलेले आहे. त्याचा दर १५ ते ३५ रुपये एवढा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी काही माफिया वाहनचालकांना धमकावत त्यांच्याकडून दीडशे ते पाचशे रुपये पार्किंगसाठी घेत आहेत.
अहमदनगर येथून बकरा खरेदीसाठी आलेले जाफर सय्यद यांनी देखील इतर वाहनांप्रमाणे रस्त्यालगत टेम्पो पार्क केला. तेव्हा एक इसम त्यांच्याकडे येऊन पार्किंगसाठी दीडशे रुपये मागू लागला. प्रत्यक्षात याठिकाणी छोट्या टेम्पोसाठी १३ रुपये दर होता. त्यामुळे जाफर यांनी पैसे देण्यास नकार देताच पार्किंग माफियाने जाफर यांना वाहनाची तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यामुळे जाफर यांनी तत्काळ देवनार पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी देखील या तक्रारीची दखल घेत अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)