मुंबई : पालिकेच्या शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाची परवानगी न घेता, अँटॉप हिल परिसरात गेल्या चार वर्षांपासून एक शाळा अनधिकृतरीत्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या शाळेवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईदेखील झाली होती. मात्र, ही कारवाई केवळ दिखावा असल्याने ही शाळा पुन्हा एकदा अनधिकृतरीत्या सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या शाळेच्या छतावरून हाय व्होल्टेज विजेच्या तारा गेल्या आहेत.अँटॉप हिल परिसरातील कामराजनगर या झोपडपट्टी परिसरात गेल्या चार वर्षांपासून ही अनधिकृत शाळा चालवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील या भूखंडावर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ही शाळा उभारण्यात आली. पालिकेचा शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागानेदेखील कुठल्याही प्रकारची परवानगी या शाळेला दिली नसल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष साबळे यांना महितीच्या अधिकारातून मिळाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील जागेवर ही शाळा बांधण्यात आल्याने, काही महिन्यांपूर्वी शाळेला नोटीस पाठवली होती. त्यानंतर शाळेवर कारवाईदेखील करण्यात आली. शाळेचा दुसरा मजला जिल्हाधिकाऱ्यांकडून तोडण्यात आला. तोडलेल्या सर्व भागाची डागडुजी करून शाळा पुन्हा ‘जैसे थे’च ठेवण्यात आली. सध्या या शाळेत सुमारे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. ज्युनियर केजी ते पाचवी असे वर्ग शाळेत आहेत. तथापि, पालिकेच्या शिक्षण विभागाचीच शाळेला मान्यता नसल्याने या मुलांच्या भविष्याचे काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)पालक अनभिज्ञयेथील अनेक रहिवाशांना ही शाळा अनधिकृत असल्याची कल्पना नाही. मात्र, ज्या रहिवाशांना याबाबत माहिती मिळाली, त्यांनी तत्काळ मुलांना या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत दाखल केले. या शाळेच्या छतावरून विजेच्या उच्च दाबाच्या तारा असल्याने मोठी दुर्घटनादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील असल्याचे सांगण्यात आले. नोटीस धाडून कारवाई केल्याची माहितीदेखील त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अँटॉप हिलमध्ये अनधिकृत शाळा
By admin | Published: January 31, 2016 2:17 AM