भूमाफियांकडून डेब्रिज टाकून उभारताहेत अनधिकृत झोपडपट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 01:16 AM2019-01-28T01:16:19+5:302019-01-28T01:16:44+5:30

वडाळा खाडी परिसराला धोका; तिवरांच्या झाडांची होतेय कत्तल

Unauthorized slums are mounting by deprivers from the landlords | भूमाफियांकडून डेब्रिज टाकून उभारताहेत अनधिकृत झोपडपट्ट्या

भूमाफियांकडून डेब्रिज टाकून उभारताहेत अनधिकृत झोपडपट्ट्या

googlenewsNext

मुंबई : महापालिका प्रशासनाच्या देखत डेब्रिज माफियांच्या मोठ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत़ वडाळ्यातील खाडी किनाऱ्यांवर रस्त्यांच्या कडेला डेब्रिजने भरलेल्या गाड्या मोठ्या संख्येने रिकाम्या होऊ लागल्या आहेत. येथील तिवरांच्या झाडांवर डेब्रिज टाकून पुन्हा अनधिकृत चाळी बनविण्याचा घाट येथील भूमाफियांनी चालवला आहे. वडाळा पूर्वेकडील अरुण कुमार वैद्य मार्गालगत असलेल्या खाडी किनाºयांवर तिवरांची मोठी जंगले या अनधिकृत डेब्रिजच्या भरणीने बुजविली गेल्याचे चित्र काही वर्षांपूर्वी निर्माण झाले होते. परिणामी संगमनगर, कमलानगर, विजयनगर, शांतीनगर अशी अनेक नगरे भूमाफिया, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या आशीवार्दाने उभारली गेली. या ठिकाणी परप्रांतीयांचा वावर जास्त प्रमाणात झाल्यामुळे गुन्हेगारी वाढली.

येथील अरुण कुमार वैद्य मार्गावर अनेक मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामध्ये मेट्रोचा कासारवडवली ते वडाळा आणि वडाळा ते जीपीओ असा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मिनी बीकेसीसारखे अनेक प्रकल्प याच मार्गावर तयार होत आहेत. सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने तिवरांची जंगले ही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. तिवरांची कत्तल हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तरीही येथील खाडीलगतच्या किनाºयांवर डेब्रिजच्या शेकडो गाड्या रिकाम्या होऊ लागल्या आहेत. डेब्रिज माफियांचा सध्याचा उपद्रव लक्षात घेता महापालिकेची कारवाई फारशी प्रभावी नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. डेब्रिज माफियांना अटकाव घालण्यासाठी नेहमीच मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात फारशी प्रभावी कारवाई होत नाही, असे चित्र आहे.

आता या ठिकाणी खाडी किनाºयांवर डेब्रिज माफियांचा पुन्हा एकदा धुमाकूळ सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. येथील खाडीलगतच्या तिवरांवर डेब्रिजच्या शेकडो गाड्या खाली करून तिवरांची कत्तल करत आहेत. या ठिकाणी आता एका भूखंडाचे स्वरूप प्राप्त झाले असून आता भूमाफिया या ठिकाणी अनधिकृत चाळी उभारण्यास सक्रिय झाले आहेत.

या भूमाफियांकडून अनेक बनावट कागदपत्रे तयार करून या झोपडपट्ट्या अधिकृत करण्यात येत आहेत. यामध्ये बनावट कागदपत्रे तयार करण्यात येत असलेल्या भामट्यांविरोधात आधी कारवाई केल्यास या भूमाफियांना आळा बसेल. त्यामुळे या कागदपत्रांची रीतसर पडताळणी केली पाहिजे, अशी मागणी स्थानिक समाजसेवक सचिन मोरे यांनी केली आहे.

याबाबत पालिकेच्या एफ उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्हाला विचारून डेब्रिज टाकले जात नाही, त्यामुळे याबाबत कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही, या ठिकाणी पथक पाठवून पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Web Title: Unauthorized slums are mounting by deprivers from the landlords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई