राखीव जागेवर अनधिकृत झोपड्या
By admin | Published: June 20, 2017 05:38 AM2017-06-20T05:38:58+5:302017-06-20T05:38:58+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून चेंबूरच्या भारतनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे येथील पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी या ठिकाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चेंबूरच्या भारतनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे येथील पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी या ठिकाणी पाण्याच्या टाकीसाठी एक भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र सध्या या भूखंडावर काही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम करून अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. याची कल्पना सर्वच शासकीय यंत्रणांना आहे. मात्र त्यांच्याकडून या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याने सध्या या परिसरात झोपड्यांची संख्या वाढतच आहे.
चेंबूर वाशी नाका हा परिसर पूर्णपणे झोपडपट्टी परिसर आहे. तसेच येथील भारतनगर हा परिसर डोंगरावर वसलेला असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. डोंगरावरून खाली येऊन या रहिवाशांना घरी पाणी घेऊन जावे लागते.
याबाबत अनेक पत्रव्यवहार केल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात असलेली काही जागा पालिकेने ताब्यात घेऊन या जागेवर पाण्यासाठी टाकी बांधण्याचे ठरले. मात्र गेल्या अनेक वर्षांत पालिकेनेदेखील या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने ही जागा अडवून काही माफियांनी या ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभ्या केल्या.
रहिवाशांना धमकी
याबाबत रहिवाशांनी पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्यानंतर आठ दिवसांपूर्वी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. मात्र पूर्णपणे या झोपड्या न तोडल्याने सध्या पुन्हा या ठिकाणी माफियांकडून या झोपड्या बांधल्या जात आहेत. याला रहिवाशांनी विरोध केला असता आम्हालाच येथील काही पक्षांचे कार्यकर्ते धमकावत असल्याची माहिती एका रहिवाशाने दिली आहे.