मुंबई : खुद्द सहायक महापालिका आयुक्तांनी मालाड येथील भररस्त्यावरील आठ गाळ््यांचे एकमजली अनधिकृत बांधकाम पाडण्याचे लेखी आदेश देऊन अडीच वर्षे उलटली तरी त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.मालाड (पश्चिम) येथील भंडारवाड्यातील पन्नालाल घोष मार्गावरील केणी हाऊस येथे किरण केणी यांनी केलेल्या पाच हजार चौ. फुटांच्या अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेच्या पी/उत्तर विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ८ आॅक्टोबर २0१३ तसेच २७ डिसेंबर २0१३ रोजी महापालिका अधिनियम ३५४ अ अन्वये नोटीसा बजावल्या होत्या. हे एकमजली आरसीसी बांधकाम करताना रस्त्यासाठी २0 फूट लांबीची जागा सोडण्यात आलेली नाही. रहदारीसाठी हा रस्ता मोकळा असावा, या मागणीसाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या बांधकामाबाबत सहायक आयुक्तांना लेखी तक्रारीद्वारे कळवले आहे.याबाबत पी/ उत्तर विभागाच्या सहायक पालिका आयुक्तांकडे सुनावणी होऊन हे बांधकाम बेकायदेशीर असल्याने ते २४ तासात जमीनदोस्त करण्यात यावे, असे आदेश ८ जानेवारी २0१४ रोजी देण्यात आले होते. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत ४ जुलै २0१४, २३ एप्रिल २0१५ आणि २८ मार्च २0१६ रोजी लेखी निवेदने महापालिकेला सादर केली होती. त्याचबरोबर महापौर स्रेहल आंबेकर, माजी महापौर सुनिल प्रभु, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नत्या तृष्णा विश्वासराव यांनीही हे आठ गाळ््यांचे अनधिकृत बांधकामाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी पत्रे सहाय्यक आयुक्तांना पाठवली आहेत.मात्र तरिही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच लेखी कळवण्यातही आले नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूरी आणि दिरंगाई करणाऱ्या पी/उत्तर विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहन कृष्णन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपराष्ट्रपतींना पाठवलेले निवेदन उपराष्ट्रपती कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवले आहे. (प्रतिनिधी)
भररस्त्यात एकमजली अनधिकृत बांधकाम
By admin | Published: August 25, 2016 2:09 AM