अविश्वसनीय : अनेक वर्षांनी क्रॉफर्ड मार्केटवर वाहन चालकांनी घेतला फुकट पार्किंगचा आनंद
By मनीषा म्हात्रे | Published: January 6, 2024 01:00 PM2024-01-06T13:00:06+5:302024-01-06T13:00:06+5:30
महापालिकेने पार्किंगचे दरपत्र लावलेले पोस्टर फाडून टाकले, त्या जागी मोफत पार्किंगचा कागद चिकटवला.
मुंबई : गेली अनेक वर्ष क्रॉफर्ड मार्केट परिसरात पायी चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागायचे. गाडी पार्क करण्यासाठी हजार-पाचशे मोजावे लागायचे. ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली. क्रॉफर्ड मार्केटवर फुकट गाडी लावता येईल, असे स्वप्नातही कधी कोणाला वाटले नसेल... पण ते स्वप्न आज सत्य झाले आहे. शुक्रवारी क्रॉफर्ड मार्केट परिसरात येणाऱ्या वाहन चालकांनी मोफत पार्किंगचा मनसोक्त आनंद लुटला. पार्किंगसाठी आज पैसे का द्यायचे नाहीत? आम्ही गाडी लावायची कुठे? असे विचारून प्रवाशांनी पोलिसांना भंडावून सोडले. महापालिकेने पार्किंगचे दरपत्र लावलेले पोस्टर फाडून टाकले, त्या जागी मोफत पार्किंगचा कागद चिकटवला.
‘लोकमत’च्या दणक्याने क्रॉफर्ड मार्केट परिसरातील सदाफुले बचत गटाच्या पे अँड पार्कचे मुदतवाढीचे कंत्राट रद्द होताच शुक्रवारी सकाळी येथे नि:शुल्क पार्किंगचा बोर्ड लागला होता. रोजच्या प्रमाणे येथे वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना हा बोर्ड पाहून विश्वासच बसत नव्हता. दक्षिण मुंबईतील या व्हीआयआपी भागात एवढी वर्षे पार्किंगची माफियागिरी सुरू होती. त्याला ब्रेक लागल्याचे वाहनचालकांच्या लक्षात येत होते. मुंबईकरांचा यावर विश्वासच बसत नव्हता. ते ‘लोकमत’चे आभार मानत होते.
गुरुवारी रात्रीच येथील पे अँड पार्कचे पैसे घेणाऱ्या केबिनला टाळे ठोकत, सदाफुलेचा बोर्ड प्रशासनाने हटविला. मोफत पार्किंगचा बोर्ड लावण्यात आला. एरवी वाटेल तो रेट कार्ड घेऊन उभी राहणारी मंडळीही गायब होती. शुक्रवारी सकाळपासूनच नेहमीप्रमाणे घाई गडबडीत वाहन पार्क करण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांचा सुरुवातीला गोंधळ उडाला. काही जण पे अँड पार्कच्या कर्मचाऱ्यांचा शोध घेत होते. तर, त्यांना अहो, पार्किंग मोफत आहे हे सांगण्यासाठी काही चालकांची लगबग सुरू होती. अनेकांकडून याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. अरे वा.. खरंच की काय? असे शब्द त्यांच्याकडून कानी पडताना दिसले. चालकांकडून देखील ‘लोकमत’च्या बातमीमुळे मनमानी कारभाराला चाप बसल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकताना दिसून आले. दिवसभरात या फुकट पार्किंगची चर्चा या परिसरात होती.