मुंबई : महाड येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर गेली दोन वर्षे सुरू असलेले मुंबईतील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट गेल्या महिन्यात पूर्ण झाले. त्यानुसार, मुंबईतील ३०४ पैकी तब्ब्ल ६१ पुलांच्या मोठ्या दुरुस्तीचे काम आवश्यक आहे. काही ब्रिटिशकालीन व जुन्या पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. मात्र, लोअर परळ येथील पुलाच्या दुरुस्तीवरून उडालेल्या गोंधळामुळे या पुलाच्या दुरुस्तीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.आॅगस्ट २०१६ मध्ये महाड येथे सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेने मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे मुंबईतील सर्व पुलांचे तातडीने स्ट्रक्टरल आॅडिट सुरू करण्यात आले. त्यानुसार, मुंबईतील सर्व पूल ब्रिज मॅनेजमेंट सीस्टिमद्वारे सुरक्षित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला, परंतु गेली दोन वर्षे या पुलांच्या आॅडिटचा अहवाल गुलदस्त्यातच होता. ४ जुलै रोजी अंधेरी येथे रेल्वेवरील पादचारी पूल कोसळण्याच्या घटनेने धोकादायक पूल आणि त्यावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.मोठ्या दुर्घटनांनंतरही महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या संथ कारभाराचे तीव्र पडसाद उमटताच, अखेर दोन वर्षांनंतर याबाबतचा अहवाल उजेडात आला आहे. त्यानुसार, मुंबईतील ३०४ पुलांपैकी ११४ पूल चांगल्या स्थितीत आहेत, तर १११ पुलांची किरकोळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे, परंतु मुंबईतील ६१ पुलांच्या मोठ्या दुरुस्तीचे काम महापालिकेला लवकरच येत्या काही वर्षांमध्ये हाती घ्यावे लागणार आहे, तर १८ पुलांच्या पुनर्बांधणीचे तातडीने गरज असल्याचे या आॅडिटमधून समोर आले आहे.तिढा कायमहँकॉक पुलाच्या धर्तीवर लोअर परळचा डेलिस पूल तातडीने पडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे बांधकाम करण्यास महापालिका तयार नाही. यामुळे पुलाच्या दुरुस्तीवरून रेल्वे आणि महापालिकेमध्ये असमन्वय दिसून येत आहे.मात्र, आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आलेल्या पुलांच्या पाहणीत आणखी पाच पुलांच्या दुरुस्तीची गरज असल्याचे समोर आले आहे. या दुरुस्तीच्या कामात महापालिकेने मदत करावी, अशी विनंती रेल्वेने केली आहे. मात्र, रेल्वेच्या हद्दीत काम करण्यास महापालिका तयार नसल्याने तिढा निर्माण झाला आहे.या पुलांच्या दुरुस्तीची मागणीअंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर ग्रँटरोड येथील फेरेर पुलालाही तडे गेले होते. महापालिका, रेल्वे आणि आयआयटी मुंबई या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या पाहणीत, ग्रँट रोड येथील फेरेर उड्डाणपूल, मुंबई सेंट्रलचा बेलासिस उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाण पूल, प्रभादेवीचा करोल पूल, महालक्ष्मी पुलाच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली आहे.यांची होणार प्राधान्याने तपासणीपुलांची संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत, त्यांच्या संरचनात्मक तपासणीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. उदा : लोकमान्य टिळक पूल, एल्फिन्स्टन पूल इत्यादी.पाठपुरावा सुरूलोअर परळ पूल बंद करण्याआधी रेल्वे प्रशासनाने महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणतीच व्यवस्था न झाल्याने प्रचंड गर्दीमुळे दुर्घटना होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिका आणि रेल्वे यांनी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे.- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्षअशी होणार दुरुस्ती...महापालिकेच्या अखत्यारितील पुलांची संरचनात्मक तपासणी दोन वर्षांपासून सुरू होती. याचे काम अंतिम टप्प्यात असून, तातडीने दुरुस्ती आवश्यक असलेल्या पुलांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानुसार, चांगल्या स्थितीतील पूल, किरकोळ दुरुस्ती आणि मोठी दुरुस्ती, पुनर्बांधणी अशी पुलांची वर्गवारी करण्यात आली आहे.पुढील काही वर्षांत तातडीने दुरुस्तीची गरज नसलेले पूल म्हणजे चांगले पूल, किरकोळ दुरुस्ती म्हणजे पुलांवरील गळती रोखणे अशी छोटी कामे, तर पुलाला धोका निर्माण करणाºया दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. मात्र, धोकादायक व पडण्याच्या स्थितीत असलेल्या पुलांची दुरुस्ती तत्काळ होणार आहे.
मुंबईतील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीबाबतही अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 4:46 AM