ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - उंच झोपड्यांना अभय देण्याची मागणी शेकण्याची चिन्हे दिसून येताच शिवसेनेने आपली बाजू सावरण्याचा आटापिटा सुरु केला आहे. त्यातच भाजपाकडून शाब्दिक फटकारे, टोलेबाजी, आरोप सुरुच असल्याने बिथरलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर महापौर दालनात येऊन आज बैठक घ्यावी लागली. यामध्ये झोपड्यांवरील कारवाई भाजपाच्या दबावाखाली शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याचा आरोप करीत प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेने आज केला. महापालिकेमध्ये दलाल आणि माफिया राज असल्याचा हल्ला भाजपाने चढविला आहे. १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई थांबविण्याच्या शिवसेनेने बुधवारी स्थायी समितीमध्ये मागणी केली.
मात्र भाजपाने या विरोधी भूमिका घेत शिवसेनेला अडचणीत आणले. मित्रपक्षातून सतत हल्ले होत असताना शिवसेनेचे पालिकेतील शिलेदारांची भूमिका लंगडी पडत आहे. यामुळे अखेर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनाच आज महापालिकेत दर्शन द्यावे लागले. महापौर दालनात तातडीच्या बैठकीमध्ये शिवसेनेने पालिका आयुक्तांना झोपड्यांवरील कारवाईबाबत जाब विचारण्याचा प्रयत्नही केला. महापालिकेतील माफिया आणि दलाल कोण हे जाहीर करण्याचे आव्हान त्यांनी आयुक्तांना दिले. तसेच गेल्या साडेचार वर्षांपासून झोपड्यांवरील कारवाईबाबत शांत भूमिका घेणाऱ्या प्रशासनाला अचानक का जाग आली.
त्यांचा बोलवता धनी राज्यातील भाजपा सरकार आहे का?असाही प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. याबाबत महापौर स्रेहल आंबेकर यांनी आयुक्तांना पत्रही पाठविले आहे.प्रतिनिधी चौकट निवडणुकासमोर असताना पालिकेची झोपड्यांवरील कारवाई म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. सेनेला याचा फटका कसा बसेल, याच्या प्रयत्नात भाजपा आहे. केवळ पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे झोपड्यांच्या उंचीबाबत भाजपाने व मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिले आहे.