Join us

भाजपाच्या मागणीने सेनेत अस्वस्थता

By admin | Published: April 03, 2015 3:08 AM

पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अखेर उशिरा का होईना चर्चा सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी

नवी मुंबई : पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अखेर उशिरा का होईना चर्चा सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात स्थानिक नेत्यांत चर्चेची पहिली फेरी पार पडली. या चर्चेत भाजपाने केलेल्या जागांची मागणी पाहता शिवसेना नेत्यांचे डोळे विस्फारल्याचे समजते. भाजपाकडून आमदार संजय केळकर, आमदार मंदा म्हात्रे, मनोज कोटक, वैभव नाईक आणि जिल्हा भाजपाचे अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी तर शिवसेनेकडून खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, बेलापूर मतदारसंघ संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे उपस्थित होते. श्रेष्ठींच्या आदेशानुसार खेळीमेळीत चर्चा पार पडल्याचे आमदार मंदा म्हात्रे आणि विठ्ठल मोरे यांनी सांगितले. या चर्चेनुसार पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यात शिवसेना-भाजपाच्या जागा वाटपासह मित्रपक्षांबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने बेलापूर मतदारसंघातून जास्त जागा मागितल्याने शिवसेनेची गोची झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवी मुंबईतील नव्या १११ प्रभागांपैकी विधानसभा निवडणुकीत भाजपा ३७ मतदारसंघात आघाडीवर होती, तर १२ जागांवर दुसऱ्या स्थानावर होती. हे सूत्र गृहीत धरून जागा वाटपाचा आग्रह भाजपाने धरला असून त्यास शिवसेना तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.(खास प्रतिनिधी)