निवडणुकांमुळे परीक्षांच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:41 AM2019-09-25T03:41:09+5:302019-09-25T07:08:50+5:30

मुंबई : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. मात्र, त्याचसोबत शाळा आणि महाविद्यालयांमध्येही गोंधळाचे ...

The uncertainty over the exam schedule due to elections | निवडणुकांमुळे परीक्षांच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे सावट

निवडणुकांमुळे परीक्षांच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे सावट

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. मात्र, त्याचसोबत शाळा आणि महाविद्यालयांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीआधीच निवडणूक असल्याने शाळांनी परीक्षा नेमक्या कधी ठेवायच्या आणि परीक्षांचे नियोजन कोणत्या कालावधीत करायचे, हा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर आहे. निवडणुकांच्या कामामध्ये शाळांतील आणि महाविद्यालयातील शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ते सांभाळून परीक्षांचे वेळापत्रक तयार करायचे असल्याने शिक्षक व मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.

शाळा आणि मुख्याध्यापकांकडे अद्याप शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक आलेले नाही. त्यातच आधीच नवीन मूल्यमापन योजनेसंदर्भातील शिक्षकांची प्रशिक्षणे सध्या सुरू आहेत. निवडणूक आयोगाकडून शिक्षकांच्या निवडणुकांच्या कामाच्या बाबतीतील प्रशिक्षण वेळापत्रक देण्यात आले असते, तर त्याप्रमाणे शाळांना विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रकही आखता आले असते, अशी प्रतिक्रिया याप्रकरणी शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली.

निवडणूक २१ ऑक्टोबरला होणार असून, त्यानंतर २४ ऑक्टोबरला निकाल आणि नंतर २५ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. त्यामुळे शाळांना १९ ऑक्टोबरपूर्वी परीक्षा संपवाव्या लागणार असल्याने, आता शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांची कसरत होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयांबाबतही परीक्षा घेण्यासदर्भात हीच परिस्थिती आहे. आधीच अकरावी प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीचे वर्ग उशिरा सुरू झाले आहेत. त्यातच प्रशिक्षणे आणि इतर कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अधिकच्या तासिकांसाठी वेळच मिळणार नसल्याने, शैक्षणिक नुकसान होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

मुंबई विद्यापीठाचाही फेरविचार सुरू
ऑक्टोबर २०१९-२० या सत्रातील निवडणुकीच्या काळातील परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती परीक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी आशुतोष राठोड यांनी दिली. निवडणुकीच्या काळातील परीक्षांसंदर्भात महाविद्यालयांशी चर्चा सुरू असून, त्यानंतरच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: The uncertainty over the exam schedule due to elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.