Join us

काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले

By गौरी टेंबकर | Published: February 08, 2023 11:45 AM

'माझे काका रुग्णालयात अतिदक्षता विभागात असुन मला अर्जंट ३ लाख रुपयांची गरज आहे ', असा मेसेज बँकिंगच्या विद्यार्थ्याला आला.

मुंबई: 'माझे काका रुग्णालयात अतिदक्षता विभागात असुन मला अर्जंट ३ लाख रुपयांची गरज आहे ', असा मेसेज बँकिंगच्या विद्यार्थ्याला आला. त्याने व्हॉट्सॲप वरील मित्राचा डिपी पाहिला आणि त्याला ७५ हजार पाठवले. मात्र मेसेज मित्र नसून भामट्याने फसवणुक केल्याचे विद्यार्थ्याच्या लक्षात आले आणि त्याने अंधेरी पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रारदार एका नामांकित बँकेत रिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करत होता. मात्र बँकिगच्या अभ्यासासाठी त्याने राजीनामा देत परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांना १२ मे, २०२२ रोजी सकाळी साडे सात वाजता इंजिनिअरिंगच्या मित्राचा डीपी असलेल्या क्रमांकावरून ३ लाखांची गरज काकांच्या उपचारासाठी असल्याचा मेसेज आला. इतकेच नव्हे तर pm13511@axisbank हा युपीआय आयडी पाठविण्यात आला.

मित्राचा डीपी पाहून तक्रारदाराला तो मित्रच असल्याची खात्री पटली व त्याने १ हजार, ४९ हजार आणि नंतर २५ हजार असे एकूण ७५ हजार रुपये सदर आयडीवर पाठवले. स्वतःला मित्र म्हणवणाऱ्या व्यक्तीने पैसे खात्यात जमा झाल्याचेही सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने काकांच्या प्रकृती बाबत विचारणा करण्यासाठी सदर व्हॉट्सॲपवर मेसेज केले मात्र त्याला ब्लॉक करण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्या मित्राच्या फोनवर त्यांनी संपर्क केला आणि मित्राने त्याला असा कोणताच मेसेज केला नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा आपण सायबर क्राईमला बळी पडल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. याची तक्रार त्याने १९३० या सायबर पोलिसांच्या हेल्पलाईनवर केली. तक्रारदार बँकिग व अन्य परीक्षेसाठी बाहेरगावी गेल्याने तेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास येऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी आता तक्रार दिली आणि १ फेब्रुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :मुंबईपोलिसधोकेबाजी