पुतण्याचा शोध घेण्यासाठी केले काकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 01:18 AM2020-10-06T01:18:44+5:302020-10-06T01:18:53+5:30
दोघांना अटक; ट्रॉम्बे चिता कॅम्पमधून घेतले ताब्यात
मुंबई : घरच्यांच्या मनाविरोधात एक अल्पवयीन मुलगी लग्न करून प्रियकरासोबत पळून गेली. उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकार घडल्यानंतर मुलीच्या काकाने मुंबईच्या कांदिवलीमधून जावयाच्या काकाचे अपहरण करविले. मात्र कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी तपास करत दोघांना ट्रॉम्बे चिता कॅम्पमध्ये जाऊन अटक केली. तर उर्वरित पाच फरार व्यक्तींचा शोध सुरू असून अटक व्यक्तींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जाफर खान (२७) आणि अब्दुल शेख (२१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर यातील मास्टरमाइंड तसेच पळून गेलेली मुलगी शबनम (नावात बदल) हिचा काका मोबीन खान याच्यासह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
शबनमचा नवरा शकील याचा काका गुलजार खान याचे अपहरण कांदिवलीच्या पोईसर एस.व्ही. रोड परिसरातून ३० सप्टेंबर, २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सात ते आठ जणांकडून करण्यात आले होते. जो केटरर्सचे काम करतो.
केटरर्स मालकाने याची तक्रार कांदिवली पोलिसांना केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी अडाणे आणि पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत गुलजारचा शोध घेत अखेर चिता कॅम्प परिसरातून त्याची सुखरूप सुटका केली.
चौकशीमध्ये शबनम आणि तिच्या पतीला मुंबईत गुलजार मदत करत असल्याचा संशय तिच्या घरच्यांना होता. त्यामुळे हे अपहरणनाट्य घडले. मात्र कांदिवली पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळत त्यांना गजाआड केले. या दोघांना ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़