Join us

काकानेच अल्पवयीन बहिणींवर केला अत्याचार; शाळेतील लैंगिक अत्याचारविरोधी कार्यक्रमात फुटली वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 9:41 AM

पालिका शाळेत पार पडलेल्या बाललैंगिक अत्याचार संबंधित कार्यक्रमात चिमुकल्यांवरील अत्याचाराला वाचा फुटली.

मुंबई : पालिका शाळेत पार पडलेल्या बाललैंगिक अत्याचार संबंधित कार्यक्रमात चिमुकल्यांवरील अत्याचाराला वाचा फुटली. सांभाळ करण्याच्या बहाण्याने काकानेच दोन बहिणींना मारहाण करत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 

याप्रकरणी धारावी पोलिसांनी पोक्सोसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचाराची बाब उघड होताच आई-वडिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्यास नकार दिला. 

समाजसेवक महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे. यामध्ये १२ आणि १० वर्षांच्या दोन बहिणींवर अत्याचार झाला आहे. १ डिसेंबर रोजी एका समाजसेवी संस्थेद्वारे शाळेत बाललैंगिक शोषण संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव करून देण्यात आली. याच दरम्यान या चिमुकलीने त्यांच्यावर काकाने केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. 

या मुलींचा सांभाळ करण्याच्या बहाण्याने २०१९ मध्ये मुलींचे वय ८ आणि ६ वर्षे असताना मुलींना मारहाण करत अत्याचार केल्याचे सांगितले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास आई-वडिलांना मारण्याची धमकी दिल्याचे सांगताच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर मुलींनी काकाकडे राहण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे ही बाब मुलीच्या आई-वडिलांना सांगताच त्यांनी तक्रारीसाठी नकार दिला. अखेर, समाजसेविका महिलेने गुरुवारी स्वतः पुढाकार घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दहा महिन्यात मुंबईत महिला संबंधित ४,९६८  गुन्हे नोंद झाले. ४५२१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ८१४ जणी विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. ९९८जणींच्या अपहरणाची नोंद झाली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी