Join us  

मनपातच अशुद्ध पाण्याचा पुरवठा

By admin | Published: May 23, 2014 3:47 AM

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विविध इमारतींमध्ये पिण्याच्या अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विविध इमारतींमध्ये पिण्याच्या अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. ते प्यायल्याने विद्यार्थी व नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. तर काही इमारतींतील रहिवाशांनी पाणी पिणेच बंद केले आहे. भिवंडी महानगरपालिकेची २८ सांस्कृतिक केंद्रे असून त्यामध्ये गोरगरीब व यंत्रमाग कामगारांच्या पाल्यांची लग्नकार्ये अथवा छोटे-मोठे समारंभ व विविध सभा होत असतात. त्या वेळी तेथे अनेक वेळा पाणी उपलब्ध नसते. असल्यास ते अशुद्ध असते म्हणून नेहमी त्यांना शुद्ध पाणी विकत आणावे लागते. अथवा समारंभापूर्वी नळाचे पाणी टाक्यांत साठवावे लागते. तसेच पालिकेच्या ३१ व्यायामशाळा, ४ क्रीडांगणे, १३ आरोग्य केंद्रे, ३ मार्केट, नाट्यगृह, प्रभाग कार्यालये, ४ अग्निशामक दल केंद्र या सर्व ठिकाणच्या इमारतींत शुद्ध पाणी मिळावे म्हणून व्यवस्थापक कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागते. महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेच्या एकूण ४८ इमारती असून तेथे विद्यार्थ्यांना शुद्घ पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी मंडळ कोणतेही प्रयत्न करीत नाही. तसेच इमारतीतील पाण्याच्या टाक्या दरवर्षी साफ न केल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असतो. जुन्या मनपा इमारतीशेजारी असलेल्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी शुद्ध पिण्याचे पाणी घेण्यासाठी पालिकेच्या जुन्या इमारतीत येत असतात. पालिकेच्या जुन्या व नवीन इमारतीत शुद्ध पाणी देणारे मशिन आहे. परंतु पाण्याच्या टाकीची सफाई बर्‍याच वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे अधिकारी वर्ग आपल्या कार्यालयात शुद्ध पाणी विकत आणून पितात. मनपाच्या इमारतीतील साफ न झालेल्या टाक्या उन्हाळ्यात साफ करण्याची व्यवस्था करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. (प्रतिनिधी)