Join us

बेशुद्ध प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 1:03 AM

खांद्यावर उचलून नेले रुग्णालयात । दादर रेल्वे स्थानकातील घटना

मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर गुरुवारी बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाला रेल्वे पोलिसाने खांद्यावर उचलून वैद्यकीय मदत केंद्रात नेले. तत्काळ उपचार मिळाल्याने प्रवाशाची प्रकृती सुधारली. प्रवाशाच्या नातेवाइकांनी शुक्रवारी दादर रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

६ फेबुवारी रोजी सायंकाळी ५.४० वाजता पोलीस हवालदार भडाळे गस्तीवर होते. या वेळी फलाट क्रमांक ३ वर प्रवासी ब्रिजेश दुबे अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडले. भडाळे यांनी हमाल, स्ट्रेचरची वाट न बघता, दुबेंना खांद्यावर उचलून फलाट क्रमांक ६ वरील वैद्यकीय मदत केंद्रात नेले. वैद्यकीय केंद्रातील डॉक्टरांनी तत्काळ दुबेंना सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णवाहिकेमधून दुबेंना नेले. दुबे रुग्णालयात रात्री ११.३० वाजता शुद्धीवर आले.

त्यांची विचारपूस करून नातेवाइकांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांना बोलविण्यात आले, अशी माहिती दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली. ब्रिजेश दुबेंना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांचा जीव बचावला.

७ फेब्रुवारी रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वर प्रवासी प्रकाश गच्छे यांच्या अचानक छातीत दुखायला लागले. वेदना असह्य झाल्याने गच्छे आरडाओरड करू लागले. गस्तीवर असलेल्या पोलीस शिपाई धनंजय गवळी यांनी गच्छेंना खांद्यावर उचलून राजावाडी रुग्णालयात नेले. गच्छेंना अतिदक्षता विभागात दाखल केले. गच्छे यांच्या नातेवाइकांनी कुर्ला रेल्वे पोलिसांचे आभार मानले.