लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील महायुतीने अनेक पातळ्यांवर खोटारडेपणा चालवला असून तो उघड करण्याचा निर्धार गुरुवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात आला.
गरवारे क्लब हाऊस येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रचंड अधोगती झाली असून जनतेला वाऱ्यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत.
राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळला नाही. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने मराठा समाजाची कशी फसवणूक केली, यासंदर्भात काँग्रेस जनतेमध्ये जाऊन सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडणार. ललित पाटीलसारख्या ड्रग माफियांनी राज्याला विळखा घातला आहे. सरकारच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा कारभार होऊच शकत नाही. यासंदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे, असेही पटोले म्हणाले.
बैठकीला यांची उपस्थिती
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.