लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय जनता पार्टीने देशात अघोषित आणीबाणी लागू केली असून, सरकारविरोधात भाष्य करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपा सरकारच्या तीन वर्षपूूर्तीची ‘पोलखोल’ करण्यासाठी मुंबई काँग्रेसने आझाद मैदानात आयोजित केलेल्या निदर्शनांदरम्यान ते बोलत होते. या वेळी मुस्लीम आणि दलितांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचे चित्रप्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले होते.चव्हाण म्हणाले की, सरकारविरोधात बोलणाऱ्या नेत्यांची धरपकड करत, सुरक्षायंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. लालूप्रसाद यादव, पी. चिदंबरम आणि अनेक नेत्यांच्या विरोधात कारस्थान रचून सरकार विरोधकांना शांत बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अशा धडपशाहीला काँग्रेस घाबरणार नाही. काही पराभवांनी खचून न जाता कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात एकजुटीने संघर्ष करावा. भाजपाला देशाबाहेर काढायची प्रतिज्ञा चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.भाजपाच्या केंद्रातील सरकारने तीन वर्षांत केवळ दलित आणि मुस्लिमांवर हल्ले केले, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. निरूपम म्हणाले की, शेतकरी, सैनिक, युवक सर्वच घटक केंद्र सरकारच्या कामामुळे निराश आहेत. सैनिकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही. नोटाबंदीनंतर अनेक कंपन्यांनी कामगार कपात केल्याने मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार झाले आहेत. दुसरीकडे गोरक्षाच्या नावाखाली देशात मुस्लीम आणि दलितांवरील हल्ले दिवसांगणिक वाढत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. ही सर्व परिस्थिती चित्रांच्या माध्यमातून आझाद मैदानात मांडत निरूपम यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तोंडसुख घेतले.
देशात अघोषित आणीबाणी
By admin | Published: May 27, 2017 2:33 AM