जमिनीखाली २५-३० मीटर खोदकाम, मेट्रो-३ प्रकल्प, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:48 AM2017-10-16T03:48:10+5:302017-10-16T03:48:27+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३च्या स्थानकांचे काम कट अँड कव्हर व न्यू आॅस्ट्रियन टनालिंग पद्धतीने केले जाणार आहे. या दोन्ही पद्धतीत जमिनीच्या २५-३० मीटर खाली खोदकाम करावे लागणार आहे
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३च्या स्थानकांचे काम कट अँड कव्हर व न्यू आॅस्ट्रियन टनालिंग पद्धतीने केले जाणार आहे. या दोन्ही पद्धतीत जमिनीच्या २५-३० मीटर खाली खोदकाम करावे लागणार आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे देण्यात आली.
मेट्रो-३ च्या कामादरम्यान फोर्ट आणि माहिम येथील इमारतींना हादरे बसण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, माहिम येथून मेट्रोच्या कामाबद्दल चीड व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सामाजिक सेवाभावी संस्थांनी कारशेडसाठी तोडण्यात येणाºया झाडांबाबत नाराजी व्यक्त करत ‘चिपको आंदोलन’ सुरू केले आहे.
मेट्रो-३ ला होत असलेला विरोध पाहता, नेमके हे काम कसे सुरू आहे? याबाबत कॉर्पोरेशनकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामासाठी खणलेल्या भागास मजबुती देण्यासाठी करावी लागणारी सिकंट पायलिंगची कामे सध्या सर्व प्रस्तावित स्थानकांच्या जागी सुरू आहेत.
उच्च क्षमतेच्या पायलिंग मशिन्सच्या साहाय्याने केल्या जाणाºया पायलिंगमुळे काही प्रमाणात कंपने जाणवू शकतात. मात्र, ही कंपने ऐतिहासिक अथवा जुन्या इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विहित केलेल्या मर्यादेच्या एक चतुर्थांश प्रमाणापेक्षाही कमी आहेत. पायलिंगमुळे होणाºया कंपनांचे नियमितपणे प्रमाणित उपकरणाद्वारे मापन केले जाते. तीन ते चार महिन्यांत पायलिंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
बांधकाम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदारांच्या तज्ज्ञांमार्फत बांधकाम क्षेत्रात येणाºया सर्व इमारतींच्या स्थितीचे सर्वेक्षण केले जाते.
त्यामध्ये इमारतीची सद्य:स्थिती, इमारतीवरील भेगा व इतर बाबींचे मापन केले जाते.
सर्वेक्षणाच्या आधारे इमारतीच्या मजबुतीच्या निकषावर स्थानकाचे संरेखन आणि भुयारीकरणाची पद्धत ठरविली जाते.
बांधकाम करताना इमारतीची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी इमारतीच्या स्थितीनुसार, योग्य ती उपकरणे इमारतींवर लावली जातात.
बांधकाम क्षेत्रातील इमारतींची कंपन मर्यादा ठरविली जाते.
बांधकामाच्या कुठल्याही पातळीवर ठरवलेल्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी नियमितपणे देखरेख ठेवली जाते.
कंपने मर्यादेपेक्षा जास्त पातळी ओलांडत असल्याचे लक्षात आल्यास, तत्काळ काम बंद केले जाते.
सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांचा वापर करत पुढील कामाला सुरुवात केली जाते.
मेट्रो-३ चे भुयारीकरण १७ टनल बोअरिंग मशिनद्वारे करण्यात येणार आहे. मशिनद्वारे जमिनीच्या २५-३० मीटर खाली खोदकाम करण्यात येणार आहे. सर्व मार्गिकेत मुख्यत: खडकाचा समावेश आहे.
सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना
बांधकामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देखरेख उपकरणांचा व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. इमारतीच्या देखरेखीसाठी बिल्डिंग सेटलमेंट मार्कर, क्रॅक मीटर, इनक्लीनोमीटर, रोड एक्सटेन्सोमीटर, सॉइल सेटलमेंट मार्कर, पव्हमेंट सेटलमेंट मार्कर, पिजोमीटर, व्हायब्रेटिंग वायर, टील्ट मीटर, व्हायब्रेशन व व्हॉइस मॉनिटर, सिस्मोग्राफर, लोड सेल व स्टेÑन गेज, शॉटक्रिट टेस्ट उपकरण, वॉटर स्टँड पाइप या उपकरणांचा यात समावेश आहे.