मुंबई - बेपत्ता दिव्यांशच्या हलगर्जीपणास कारणीभूत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज सकाळी मनसेच्या नेतृत्वाखाली पी दक्षिण वॉर्डवर काढलेल्या धडक मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,वंचित आघाडी हे राजकीय पक्ष एकत्र आले होते.आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे पक्ष राजकीय पक्ष बेपत्ता दिव्यांशला न्याय देण्यासाठी प्रथमच एकत्र आले अशी चर्चा गोरेगावकारांमध्ये होती.महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विधानसभा आणि इतर विविध राजकीय पक्षांनी आज सकाळी गोरेगाव पश्चिम एमजी रोडच्या मनसे मध्यवर्ती कार्यालय ते एस.व्ही.रोड ते पी दक्षिण वॉर्ड कार्यालयावर हा धडक मोर्चा नेला..या मोर्च्यात विविध पक्षाचे सर्व अंगिकृत संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.गोरेगाव (पूर्व),विटभट्टी, आंबेडकर चौक येथून १० जुुलै रोजी रात्री ९.३० च्या सुमारास दिव्यांश सिंह हा २ वर्षाचा मुलगा गटाराला झाकण नसल्यामुळे तो त्या गटारात पडला.अद्याप ही दिव्यांश सापडला नसून, महानगर पालिकेच्या या हलगर्जीपणास पी/दक्षिण वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त आणि परिरक्षण विभाग व संबंधीत अधिकारी कारणीभूत आहेत असा आरोप गोरेगाव विधानसभा अध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी केला आहे.त्यामुळे पी दक्षिण वॉर्डच्या साहाय्यक पालिका व संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मनसे,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी आदी विविध राजकीय पक्ष प्रथमच एकत्र आले होते.यावेळी मोर्चेकरांनी पी दक्षिण वॉर्डच्या साहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांना निवेदन दिले. आज सदर मोर्चा हा फक्त ट्रेलर होता, जर संबंधित पालिका अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हा दाखल झाला नाही तर यापुढे पिक्चर दाखवू असा इशारा विरेंद्र जाधव यांनी पालिका प्रशासनाला यावेळी दिला.दरम्यान गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी या प्रकरणात पी दक्षिण वॉर्डच्या मनपा कर्मचाऱ्यांना उगीचच बळीचा बकरा बनवल जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे यावर कडक टिपणी केली.पालिका प्रशासनाचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. या गटारावरचे झाकण विघ्नसंतोषी व्यक्तीने काढल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रथम या व्यक्तीला शोधून काढावे अशी मागणी त्यांनी केली.चूक कोणाची सजा कोणाला?मनपा कर्मचाऱ्यांना अश्या प्रकारांपासून संरक्षण देण्यासाठी काय करता येईल? असे मत उदय चितळे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. दिव्यांश लापता केसमध्ये लहान मूल १०० फूट दुर असलेल्या घरातून येऊन गटारात पडत, अश्या वेळी त्याचे आई वडीलांनी त्या एकट्याला बाहेर कस जाऊ दिले?असा सवाल त्यांनी केला.