एका क्लिकवर समजणार मधुमेहाचा धोका

By admin | Published: June 1, 2016 03:11 AM2016-06-01T03:11:57+5:302016-06-01T03:11:57+5:30

कामाचा तणाव, अनियमित खाण्याच्या वेळा, कमी झोप या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे काहींना मधुमेह होण्याचा अधिक धोका आहे

Under one click, diabetes risk | एका क्लिकवर समजणार मधुमेहाचा धोका

एका क्लिकवर समजणार मधुमेहाचा धोका

Next

मुंबई : कामाचा तणाव, अनियमित खाण्याच्या वेळा, कमी झोप या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो आहे. सध्याच्या जीवनशैलीमुळे काहींना मधुमेह होण्याचा अधिक धोका आहे. कोणाला मधुमेह होण्याचा किती वर्षांनी धोका आहे, याची माहिती आता केवळ एका क्लिकवर मिळणार आहे. कारण महापालिकेच्या सायन रुग्णालयाच्या साहाय्याने ठाकूर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटने ‘बीट डायबेटिस’ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. प्लेस्टोअरवर हे अ‍ॅप्लिकेशन मोफत उपलब्ध आहे.
कोणत्या गटातील व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका अधिक आहे, याचे सर्वसामान्य मानदंड ठरलेले आहेत. पण, प्रत्येकाची शरीररचना, जीवनशैली यावरून त्या व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका किती वर्षांनी आहे, याची माहिती देणारे हे अ‍ॅप्लिकेशन असल्याची माहिती सायन रुग्णालयाच्या जन औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे - गोखे यांनी दिली. हे अ‍ॅप्लिकेशन मोबाइलवर ‘बीट डायबेटिस एल.टी.एम.एम.सी. मुंबई’ या नावाने उपलब्ध आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांत या अ‍ॅप्लिकेशनवरची माहिती उपलब्ध आहे. डॉ. सीमा आणि साहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुजाता पोळ यांनी मिळून अ‍ॅप्लिकेशनसाठी मधुमेहासंदर्भातील शास्त्रीय माहिती संकलित केली आहे. ठाकूर इन्स्टिट्यूटच्या प्रभारी संचालिका डॉ. विनीता गायकवाड यांच्या टीमने हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्या हस्ते या अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण करण्यात आले.
या अ‍ॅप्लिकेशनमध्ये गेल्यावर भाषेचे तीन पर्याय येतात. त्यानंतर ‘बीएमआय गणना’, ‘रक्तातील साखर तपासक’, ‘जोखीम गणना’ असे तीन पर्यायदेखील उपलब्ध आहेत. जोखीम गणना हा पर्याय निवडल्यावर आठ प्रश्न येतात. त्या प्रत्येक प्रश्नाला पर्याय दिले आहेत. या आठही प्रश्नांचे अचूक पर्याय निवडल्यास मधुमेह होण्याचा धोका किती वर्षांनी आहे, याची माहिती उपलब्ध होत असल्याचे डॉ. सीमा यांनी सांगितले.
त्याचबरोबर मधुमेह म्हणजे काय, मधुमेहाचे प्रकार याविषयी माहिती या अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे. प्रतिबंधात्मक उपायावरही माहिती देण्यात आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे या अ‍ॅप्लिकेशनमध्ये मुंबईतल्या दवाखान्यांची माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या ठिकाणी मधुमेह तपासणी होते, उपचार होतात याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने हे अ‍ॅप्लिकेशन वापरले आणि त्याला मधुमेह होण्याचा धोका अधिक असल्याचे समजले; तर आता काय करायचे, हा प्रश्न त्याला पडणार नाही. त्या व्यक्तीला तत्काळ काय करायचे, कोणत्या दवाखान्यात जायचे अशी सर्व माहिती उपलब्ध होते, असे डॉ. सीमा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Under one click, diabetes risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.