Join us

नोकरीच्या बहाण्याने तरुणांना घातला १ कोटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 9:17 AM

नवी मुंबई : रेल्वेत विविध पदांवर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर ...

नवी मुंबई : रेल्वेत विविध पदांवर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, दोन वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दीपककुमार सिन्हा (४८) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दीपककुमार सिन्हामूळचा गुजरातच्या वडोदरा परिसरात राहणारा असून त्याने खारघर येथे कार्यालय थाटून हा अपहार केला होता. रेल्वेत विविध पदांवर नोकरीला लावण्याचे आमिष बेरोजगार तरुणांना देत त्याने लाखो रुपये घेतले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र देऊन पोबारा केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिन्हाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वेळी त्याने २२ हून अधिक तरुणांना १ कोटी ३ लाख ७९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले होते. मात्र त्याच्याविषयीची ठोस माहिती कोणाकडेच नव्हती. यामुळे आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २चे पथक त्याचा शोध घेत होते.

दरम्यान, गुजरातमधील वडोदरा परिसरात रहात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांच्या पथकाने त्या ठिकाणी काही दिवस पाळत ठेवून सिन्हा याच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर त्याने झारखंड व गुजरातमध्येही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.