राज्यात सात जण निरीक्षणाखाली, कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:52 AM2020-03-03T05:52:13+5:302020-03-03T05:52:16+5:30
आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. सध्या मुंबईत दोघे, पुणे येथे चार आणि नाशिक येथे एक जण भरती आहे.
मुंबई : कोरोना विषाणूच्या (कोविड - १९) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सात जण निरीक्षणाखाली आहेत. मात्र, आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. सध्या मुंबईत दोघे, पुणे येथे चार आणि नाशिक येथे एक जण भरती आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयात निरीक्षणाखाली १३७ जणांना ठेवले होते. त्यापैकी १३२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर १३० जणांना घरी सोडण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
बाधित भागातून आलेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांनी २ आठवडे घरी थांबावे. सार्वजनिक संपर्क टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, इराण, इटली या १२ देशांतील ५३५ विमानांमधील ६४,०९८ प्रवासी तपासण्यात आले. राज्यात बाधित भागातून ३८२ प्रवासी आले. त्यापैकी ३१८ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात १३७ जणांना भरती केले होते. त्यापैकी १३२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले असून, इतर ५ जणांचे अहवाल मंगळवारी मिळतील.
विषाणूच्या जनुकामधील केवळ एका प्रथिनाच्या बदलामुळे प्राण्यापासून माणसातील संक्रमण शक्य झाले असावे, असा अंदाज आहे. माणसाला बाधित करणाऱ्या या विषाणूच्या ‘अल्फा कोरोना व्हायरस’, ‘बिटा कोरोना व्हायरस’ (मर्स, सार्स), ‘नॉव्हेल कोरोना व्हायरस २०१९’ या तीन प्रजाती आहेत. या विषाणूचा प्रसार प्राण्यापासून माणसाला किंवा माणसापासून माणसाला होऊ शकतो. बाधित रुग्णाची शिंक किंवा खोकल्यातून बाहेर फेकल्या गेलेल्या ‘ड्रॉपलेट्स’च्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होऊ शकतो. श्वासाद्वारे पसरणाºया या सर्व विकारांचे संक्रमण याचप्रकारे होते. अचानक ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, उलटी, हगवण, न्यूमोनिया अशी या विषाणूबाधेची काही लक्षणे आहेत. त्वरित निदान, संबंधित रुग्णाला निरोगी व्यक्तींपासून दूर ठेवणे (आयसोलेशन) आवश्यक आहे, असे फिजिशियन डॉ. राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
>कोरोनाबाबत समाजमाध्यमांतील संदेश चुकीचे
मुंबई : कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य विभागामार्फत यासंबंधी विविध माध्यमांतून जाणीवजागृती करण्यात येत असून समाजमाध्यमांवर कोरोनासंबंधी फिरणारे संदेश, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितले.
यासंबंधी सदस्य संजय पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात सविस्तर माहिती देतांना टोपे म्हणाले की, या विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ हे नाव दिलेले आहे. कोरोनाचा संसर्ग मांसाहार केल्याने होत नाही. यासंबंधी समाजमाध्यमांवर जे संदेश फिरत आहेत. ते चुकीचे असून पशुपालन आयुक्तांमार्फत सायबर गुन्हे शाखेकडे त्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्णपणे खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. मुंबई आंतररष्ट्रीय विमानतळावर चीनसह १२ देशांतून येणाºया प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात आहे. विमानतळावर तपासणी कशापद्धतीने केली जाते हे पाहण्याकरिता लवकरच विमानतळाला भेट देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
जेएनपीटी तसेच अन्य बंदरांवर देखील तपासणी केली जात आहे. सध्या या आजारावर लक्षणानुसार उपचार पद्धत अवलंबली जात आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक विलगीकरण स्थापन करण्यात आला आहे. संसर्ग रोखण्यासाठी वापरला जाणारा एन-९५ मास्कची राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्धता आहेत. ट्रेनिंग आॅफ ट्रेनर्स अंतर्गत चार महत्त्वाच्या डॉक्टरांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यभर पोस्टर्स, रेडीओ, दूरचित्रवाहिन्यांमार्फत जाणीवजागृती केली जात आहे. पुणे येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्या श्रीमती प्रणीती शिंदे, भारती लव्हेकर, रोहित पवार, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, नितेश राणे, अमीन पटेल यांनी भाग घेतला.
>अशी घ्या काळजी
वैयक्तिक स्वच्छता ठेवा.
शिंकताना-खोकताना रुमालाचा आवर्जून वापर करा.
सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास असणाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
चीनमधून प्रवास केला असल्यास डॉक्टरांच्या आधीच निदर्शनास आणून द्यावे.
‘ट्रॅव्हल हिस्टरी’ असल्यास उपचारांपूर्वीच डॉक्टरांना फोनवर सांगावे.
‘ड्रॉपलेट्स’द्वारे विषाणूचा प्रसार