...तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; 'सपा'नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 10:44 AM2024-07-20T10:44:08+5:302024-07-20T10:46:02+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी तयारी सुरू केली आहे. 

Under the leadership of Akhilesh Yadav, the Samajwadi Party prepared for the Maharashtra assembly elections | ...तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; 'सपा'नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग

...तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; 'सपा'नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आम्हाला सन्मानजनक जागा देतील अशी अपेक्षा आहे असं सांगत समाजवादी पक्षाने विधानसभेचे रणशिंग फुंकलं आहे. सपाच्या नवनियुक्त खासदारांचा सन्मान मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमातूनच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. 

भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मविआकडून सपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात विरोधकांची महाविकास आघाडी आहे त्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांच्या NCP चा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर हे इंडिया आघाडीचे घटक आहेत. इंडिया आघाडीत समाजवादी पक्षाची भागीदारी मोठी आहे. जर अखिलेश यादव यांनी काही सांगितले तर त्याला इंडिया आघाडीतील कुणीही नकार देणार नाहीत. आम्हाला आमच्या हक्काच्या जागा मिळायला हव्यात. सन्मानजनक जागावाटप हवे असं त्यांनी म्हटलं.

तसेच सध्या आमचे २ आमदार आहेत परंतु आम्ही १०० आमदारांवर भारी पडू शकतो. आमचे १० आमदार निवडून येऊ शकतात असंही आमदार रईस शेख यांनी सांगितले. समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात लोकसभा जागा लढवल्या नाहीत. उत्तर प्रदेशात आम्ही ३७ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी भाजपाला झटका दिला. महाराष्ट्रात सपाचे २ आमदार आहेत ते मुस्लीम समुदायातून येतात. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बनू शकत नाही असं सपा खासदार अवेधश प्रसाद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर भागाचे प्रतिनिधित्व करणारे सपा आमदार अबु आझमींनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात पक्षाचं मनोबल वाढलं आहे. उत्तर भारतीयांना कुणीही आव्हान देऊ नये, अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. त्यांनी किती गाड्या फोडल्या, दुकाने तोडली. मला एकदा गृहमंत्री बनू द्या मग या लोकांना असं सांभाळेन ते कधीही विसरू शकत नाहीत असं सांगत आझमींनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला. 

Web Title: Under the leadership of Akhilesh Yadav, the Samajwadi Party prepared for the Maharashtra assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.