मुंबई : स्वच्छ मुंबई मोहिमेंतर्गत गेल्या महिनाभरात रस्त्यांवरून १०२ मेट्रिक टन राडारोडा, ७० मेट्रिक टन कचरा, २५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. त्याचबरोबर ६३४ किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुण्यात आले आहेत.
एक हजार ५५५ कामगार कर्मचाऱ्यांनी १७५ संयंत्राच्या साहाय्याने हे काम केले आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा गोळा करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी १७५ वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टिंग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणा या कामात पालिकेच्या मदतीला आहे.
दैनंदिन स्वच्छता कामे अविरत सुरू असताना सखोल स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने मुंबईतील कानाकोपऱ्यातील, लहानसहान गल्लीबोळातील राडारोडा, कचरा उचलण्यासह स्वच्छतेची इतरही कार्यवाही होत असल्याने मुंबईकर नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सर्व परिमंडळाचे संबंधित उपआयुक्त, सहायक आयुक्त, अधिकारी, स्थानिक नागरिक या मोहिमेत सहभागी होत आहेत.
येथे केली स्वच्छता-
१) शनिवारी विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, ऑपेरा हाऊस जंक्शन, चर्नी रोड स्थानक, मौलाना अब्दुल कलाम आझाद मार्ग; परिमंडळ २ - दादासाहेब फाळके मार्ग; खेरनगर मार्ग, विवान उद्यान मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, सोमवार बाजार, आर. टी. ओ. मार्ग, विठ्ठल नारायण पुरव मार्ग, अणुशक्ती नगर, अंधेरी घाटकोपर जोड रस्ता, असल्फा व साकीनाका मेट्रो स्थानक, घाटकोपर पश्चिम, स्वामी नारायण चौक, हिरानंदानी जोड मार्ग, कैलास संकुल, महात्मा फुले मार्ग, विद्यालय मार्ग, एम. के. बेकरी, कांदिवली मेट्रो स्थानक येथे स्वच्छता करण्यात आली.