भुयारी मेट्रो - ३ : प्रकल्पाचे एकूण ५९ टक्के बांधकाम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:40 PM2020-09-05T16:40:52+5:302020-09-05T16:41:31+5:30
८५ टक्के भुयारीकरण
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरु असून प्रकल्पाचे आतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५ टक्के भुयारीकरण आणि एकूण ५९ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. यासह प्रणाली यंत्रणाची कामे देखील प्रगतीपथावर आहेत. आता सद्यस्थितीनुसार एकूण २ मेट्रो स्थानकांच्या स्टेशन बॉक्सचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विधानभवन स्थानकाचे ७५.४५ टक्के आणि एम.आय.डी.सी.स्थानकाचे ७८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
मेट्रो स्थानकांच्या बांधकामा अंतर्गत स्थापत्य कामांमध्ये भुयार आणि भूमिगत स्थानकांच्या निर्मितीचा समावेश आहे. भुयारीकरण टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) द्वारे केले जात आहे. स्थानकांची निर्मिती कट अँड कव्हर (सी अँड सी) व न्यू ऑस्ट्रियन (एनएटीएम) पद्धतीचा वापर करून केली जात आहे. एकूण २६ भूमिगत स्थानकांपैकी १९ स्थानके कट अँड कव्हर पद्धतीने व उर्वरित ७ स्थानके एनएटीएम आणि सी अँड सीच्या विविध संयोजनांचा वापर करून बांधली जात आहेत. याशिवाय या प्रकल्पामध्ये पुनर्वसन आणि पुनर्विकासाची प्रक्रिया माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन राबवण्यात आली आहे.
-------------------------
वैशिष्ट्ये
- सर्वात जास्त रहदारीच्या ठिकाणावर परिवहन सेवा
- नरीमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी आणि सीप्झ प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे यांना जोडले जाणार
- स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोडले जाणार
- काळबादेवी, वरळी, एमआयडीसी यासारखा उपनगरीय रेल्वे द्वारे जोडला न गेलेला भाग या मेट्रो मार्गिकेद्वारे जोडला जाणार आहे
- अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि मनोरंजन केंद्रे यांना ही मार्गिका जोडली जाणार
- एक तासापेक्षा कमी वेळेत कफ परेड ते सीप्झ पर्यंत प्रवास होणार शक्य
-------------------------
फायदे
- अतिरिक्त सुरक्षिततेसाठी बंद कोच आणि प्लॅटफॉर्म स्क्रीनची उपलब्धता
- स्मार्ट कार्ड, टोकन आणि एकत्रित तिकिटांच्या सुविधेद्वारे स्वयंचलित भाडे संकलन
- प्रतिवर्ष २.६१ लाख टन कार्बनडायऑक्साइडची निर्मिती घटेल
- अत्याधुनिक, ऊर्जा कार्यक्षम मेट्रो कोच
- मुंबई मेट्रो-३ ची अंदाजित प्रवासी संख्या : दररोज १७ लाख (२०३०)
-------------------------
प्रकल्पात एकूण ७ पॅकेज असून त्या कामासाठी ५ कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पॅकेज स्थानकांची नावे कंत्राटदारांची नावे
१ कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक लार्सन अँड टुब्रो - एस.टी.ई.सी. जेव्ही
२ सीएसटी मेट्रो, कळबादेवी, गिरगाव, ग्रांट रोड हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनी - एम.एम.एस. जेव्ही
३ मुंबईसेंट्रल, महालक्ष्मी, वरळी, विज्ञानसंग्रहालय, आचार्य अत्रे चौक डोगस आणि सोमा
४ सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी सीईसी - आयटीडी सीईएम - टीपीएल जेव्ही
५ धारावी, बीकेसी, विद्यानागरी, सांताक्रुझ जे कुमार - सीआरटीजी
६ स्थानिक विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ जे कुमार - सीआरटीजी
७ मरोळनाका, एम. आय. डी. सी., सीप्झ लार्सन अँड टुब्रो - एस.टी.ई.सी. जेव्ही
-------------------------