मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरु असून, बुधवारी मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे विधान भवन मेट्रो स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे पूर्ण झालेले बांधकाम पॅकेज १ च्या अंतर्गत आहे. यात तळाचा स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब आणि छताचा स्लॅब या कामांचा समावेश आहे.
एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले, विधान भवन स्थानकाद्वारे मंत्रालय, विधान भवन, नवीन प्रशासकीय इमारत जोडले जातील. विधान भवन स्थानकाचे बांधकाम कट आणि कव्हर या आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी सात प्रवेश-निकसद्वारांची सुविधा आहे.
विधान भवन स्थानकाचा विचार करता ७५.४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. स्थानकावरून रोज ७५ हजार पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतील. पॅकेज १ अंतर्गत हुतात्मा चौक, चर्चगेट आणि कफ परेड स्थानकाची कामे वेगात सुरू आहेत. दरम्यान, एम.आय.डी.सी. मेट्रो स्थानकाचे अशा प्रकारचे काम पूर्ण करण्यात आले आहे.