भुयारी मेट्रो - ३ : सीप्झ स्थानकातील स्लॅबचे काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 06:21 PM2020-12-22T18:21:15+5:302020-12-22T18:21:36+5:30
Underground Metro - 3 : मेट्रो मार्ग-३ सुरू झाल्यानंतर पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्याचे काम करेल.
मुंबई : कुलाबा - वांद्रे - सीप्झ या मेट्रो-३ मार्गावरील सीप्झ स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, सीप्झ स्थानकावरून दाररोज २४ हजार हून अधिक प्रवाशांनी प्रवास करणे अपेक्षित आहे. तर मरोळ नाका आणि एम.आय.डी.सी. स्थानकांच्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बेस स्लॅब, कॉन्कोर्स स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब आणि रूफ स्लॅब असे सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले, सीप्झ व्यवसायिक केंद्र आहे. सध्या ते उपनगरीय रेल्वेमार्गाद्वारे जोडले गेले नाही. येथे इलेक्ट्रॉनिक प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा, सीप्झ गाव बस स्थानक, होली स्पिरीट रुग्णालय, आरे मिल्क कॉलनी ही महत्त्वाची स्थळे आहेत. या व्यवसाय केंद्राला भेट देणाऱ्या प्रवाशांना भविष्यात सोयीचे होईल. तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले की, परिसरातील वाहनांच्या रहदारीमुळे आव्हाने उभी राहिली होती. वाहतूक पोलिसांच्या सहाय्याने काम सोपे झाले. मेट्रो मार्ग-३ सुरू झाल्यानंतर पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्याचे काम करेल.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मेट्रो - ३ प्रकल्प राबविला जात आहे. मरोळ नाका स्थानक हे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड पद्धतीने बांधले जाणार आहे. येथे चार प्रवेश-निकासद्वार आहेत. सीप्झ आणि एम.आय.डी.सी. स्थानके कट-अँड-कव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहेत. येथे अनुक्रमे चार आणि तीन प्रवेश-निकासद्वार आहेत.