कोरोनातून सावरत भुयारी मेट्रो-३चे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:40 AM2020-06-22T00:40:52+5:302020-06-22T00:41:09+5:30

परिणामी मेट्रोसह उर्वरित कामांची डेडलाइन गाठण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Underground Metro-3 starts from Corona | कोरोनातून सावरत भुयारी मेट्रो-३चे काम सुरू

कोरोनातून सावरत भुयारी मेट्रो-३चे काम सुरू

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचा फटका जगासह देशाला बसत असून, सर्वच स्तरांतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. विशेषत: पायाभूत सेवासुविधांशी निगडित असलेल्या मुंबईतल्या मेट्रो, मोनोरेलसह उर्वरित कामांचेही कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. पायाभूत सेवासुविधांशी निगडित अनेक कामगार आपापल्या मूळगावी गेल्याने मेट्रोच्या कामाची गती मंदावली आहे. कामे सुरू असली तरी त्याचा वेग कमी झाला असून, बहुतांश पायाभूत सेवासुविधांशी निगडित कामे मागे पडली आहेत. परिणामी मेट्रोसह उर्वरित कामांची डेडलाइन गाठण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३च्या कामालाही कोरोनाचा फटका बसला आहे. मेट्रो-३ हा देशातील पहिला भुयारी प्रकल्प आहे. या प्रकल्पाकडे अवघ्या देशासह जगाचे लक्ष लागून राहिले आहे. तर उर्वरित मेट्रो प्रकल्पही भविष्यात मुंबई महानगर प्रदेशाची गती वाढविणार असले तरी, आता मात्र या कामांना मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वकाही ठप्प झाले असताना आता मुंबईतल्या मेट्रो, मोनोसह उर्वरित पायाभूत सेवासुविधांची कामे ठप्प होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आजघडीला सुरू असलेल्या कोणत्याही मेट्रो प्रकल्पाची कामे थांबविण्यात आलेली नाहीत. प्रत्येक मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होते. फक्त मेट्रोसाठी काम करणारे काही कामगार आपापल्या मूळगावी परत गेल्याने किंचित का होईना मेट्रोच्या कामाचा वेग मंदावला. लॉकडाऊनच्या काळात मेट्रोची सर्व कामे सुरू असल्याचा दावा एमएमआरडीएने केला. मात्र या काळात किती टक्के कामे झाली, किती कामगार मूळगावी गेले याची माहिती पुरेशी स्पष्ट झालेली नाही. याचा ताळेबंद लावण्याचे काम आता सुरू आहे, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. मेट्रोव्यतिरिक्त ज्या मोनोरेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मात्र धावण्यात ती कमी पडली; अशी मोनोरेलसुद्धा लॉकडाऊनच्या काळात धावत होती. याचे कारण म्हणजे देखभाल दुरुस्ती. देखभाल दुरुस्तीच्या कारणाने मोनोरेलची चाचणीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
भुयारी मेट्रो-३चा विचार करता यासाठी येथे एकूण १५ हजार कामगार काम करीत आहेत. मात्र कोरोनामुळे यापैकी अनेक कामगार आपल्या मूळगावी गेले आहेत. परिणामी आता कामगारांची कमतरता जाणवत आहे, तर ४ हजार कामगार काम करत आहेत. महिन्याला १ लाख मेट्रिक टन उत्खनन केले जात होते. आता हे प्रमाण ४३ हजार झाले आहे. महिन्याला १ हजार ५०० मीटर बोगदा खणला जात होता. ते प्रमाण आता ३३० मीटरवर आले आहे. स्लॅबच्या कामाचा विचार करता हे काम १६ हजार चौरस मीटरवरून ४ हजार ७०० वर आले आहेत. एकूण काम ६ महिने मागे गेले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताफ्यात पहिले रेल रोड मूव्हर मशीन दाखल झाले. मेट्रो गाड्यांच्या शँटिंगसाठी ही मशीन वापरण्यात येणार आहे. ही मशीन रेल्वेरूळ आणि रस्त्यावर चालविता येणार आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील मान्सूनपूर्व कामे हाती घेतली. डांबरीकरणाचा यात समावेश आहे. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ मार्गावर लाल बहादूर शास्त्री मार्गावर गर्डर बसविले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो ७ मार्गावरील पोईसर स्थानकात सरकते जिने बसवण्याचे काम सुरू झाले. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ साठीच्या ४ लिफ्टची सामग्री मुंबईत दाखल झाली. ५७ लिफ्टपैकी ४ बाणडोंगरी, आरे, पठाणवाडी आणि मागाठाणे येथे प्रत्येकी दोन आहेत. २८ जूनपर्यंत २१ दाखल होणार आहेत. १८चे काम सुरू आहे. मेट्रो-३च्या भुयारीकरणाचे काम ८३ टक्के झाले आहे. तर प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी ५६ टक्के काम पूर्ण झाले. दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो-२ अ या संपूर्ण उन्नत मार्गिकेच्या कामासाठी शिंपोली येथील नाल्यावर गर्डर टाकण्याचे कठीण काम पूर्ण झाले.
अंधेरी ते दहिसर ( मेट्रो ७) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो २ अ) या दोन मेट्रो मार्गांवरील सुरक्षाव्यवस्थेसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विविध मेट्रो प्रकल्पांसाठी स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन आॅपरेटर म्हणून निवड झालेल्या ४१ उमेदवारांना आॅनलाइन देण्याचे काम सुरू करण्यात आले. अकरा हजार कामगारांच्या आरोग्याची काळजी एमएमआरडीएकडून घेतली जाते. लेबर कॅम्पमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली.

Web Title: Underground Metro-3 starts from Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.